भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 07:21 IST2025-11-06T07:20:30+5:302025-11-06T07:21:16+5:30
नगरपरिषद, जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकांसाठी कंबर कसून तयारी

भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पक्षाच्या प्रभारींची बुधवारी घोषणा केली. मुंबईचे प्रभारी म्हणून मंत्री आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महापालिका या तिन्ही निवडणुकांसाठी हे नेते प्रभारी म्हणून काम पाहतील.
जळगाव जिल्ह्यातील नेते असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याचवेळी मंत्री संजय सावकारे यांच्याकडे जळगाव जिल्हा सोपविण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातीलच असलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडे नंदुरबारचा प्रभार असेल.
बीडमध्ये मंत्री पंकजा मुंडे, छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री अतुल सावे, तर लातूरमध्ये माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर हे प्रभारी असतील. खा धनंजय महाडिक -कोल्हापूर, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड - जालना, खा. अशोक चव्हाण नांदेड, डॉ. संजय कुटे अमरावती, मंत्री गणेश नाईक ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भिवंडी, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, कल्याण आणि उल्हासनगर. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ पुणे शहर व पुणे ग्रामीण, तर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे अहिल्यानगर शहर व ग्रामीण भागाचे प्रभारीपद देण्यात आले आहे.
आ. डावखरे यांना संधी
आ. निरंजन डावखरे यांच्याकडे रत्नागिरीचे, तर आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडे रायगडचे प्रभारीपद सोपविण्यात आले आहे. सिंधुदुर्गची जबाबदारी मंत्री नितेश राणे यांच्याकडे, तर बुलढाण्याचे मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडे बुलढाणा, तर आ. रणधीर सावरकर हे अकोलाचे प्रभारी असतील.