"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 13:58 IST2025-07-31T13:57:28+5:302025-07-31T13:58:47+5:30
Malegaon Blast Case And BJP : भाजपाने मालेगाव निकालावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.

"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व ७ जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. भाजपाने मालेगाव निकालावरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "आजच्या निर्णयाने हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली. काँग्रेसनेहिंदू समाजाची माफी मागायला हवी" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे. "मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे. सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसने जाणीवपूर्वक “हिंदू दहशतवाद” हा शब्दप्रयोग प्रचारात वापरत हिंदू समाजाला, श्रद्धेला, जगभरात बदनाम करण्याचा प्रयत्न केला."
🔸मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील विशेष एनआयए न्यायालयाचा निकाल केवळ न्यायालयीन निर्णय नाही, तर तो एका दीर्घकाळ चाललेल्या राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश आहे.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 31, 2025
सर्व आरोपांमागे कोणताही ठोस पुरावा नाही, हे न्यायालयाने स्पष्टपणे नोंदवलं. पण याहून गंभीर बाब म्हणजे काँग्रेसनं…
"शतकानुशतकं मानवतेचं आणि सहिष्णुतेचं प्रतीक असलेल्या हिंदू धर्माला दहशतवाद्यांच्या रांगेत उभं करण्याचा अक्षम्य गुन्हा काँग्रेसने केला. आज कोर्टाने सत्य मांडलं, आता काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागायला हवी! हिंदू कधीच दहशतवादी नव्हता आणि नसेलही न्यायालयाच्या आजच्या निर्णयाने हिंदूंना बदनाम करणाऱ्यांना मोठी चपराक मिळाली आहे" असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी मालेगाव निकालावरून काँग्रेसवर टीका केली आहे. "काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक. मालेगाव बॅाम्बस्फोट खटल्याचा निकाल हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे काँग्रेसचं हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान या निकालाने हाणून पाडलं आहे. तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी प्रथम हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला व नंतर शरद पवार यांनी अलिबाग येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात याचा उच्चार केला" असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.