“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 13:56 IST2025-11-01T13:54:02+5:302025-11-01T13:56:50+5:30
BJP Chandrashekhar Bawankule On MVA MNS Morcha: निवडणुकीच्या काळात असा मोर्चा काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा महाविकास आघाडीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका भाजपाने केली आहे.

“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
BJP Chandrashekhar Bawankule On MVA MNS Morcha: मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी याविरोधात विरोधी पक्ष मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढत आहेत. या मोर्चात काँग्रेस, शरद पवार गट, उद्धवसेना यांच्यासह माकप, भाकप, शेकाप, मनसे आणि इतर संघटना सहभागी होणार आहेत. ‘सत्याचा मोर्चा’ निमित्ताने पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच भाजपाने या मोर्चावर टीका केली असून, महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली होती का? असा प्रश्न विचारला आहे.
‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लवकरच निघाले. पश्चिम रेल्वेवरील दादर स्थानकातून चक्क लोकल ट्रेन पकडून राज ठाकरे चर्चगेट येथे पोहोचले. यावेळी एका मुंबईकराने लोकल ट्रेनच्या तिकिटावर राज ठाकरे यांची सही घेतली. राज ठाकरे यांनी दादर ते चर्चगेट असा प्रवास विंडो सीट पकडून केला. यावेळी अनेक मनसे नेते उपस्थि होते. विरोधकांनी मतदारयादीतील घोळाचा मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या मोर्चावरून महाविकास आघाडीवर टीका केली.
महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली होती का?
महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली होती का? लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये घोळ नव्हता का? दुबार आणि तिबार नावे मतदार याद्यांमध्ये नसावीत ही आमचीही भूमिका आहे. निवडणुकीच्या काळात असा मोर्चा काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा महाविकास आघाडीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. अशा मोर्चाला राज ठाकरे जात आहेत याचे आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
दरम्यान, लोकसभेला तेच मशीन होते, त्याच मतदार याद्या होत्या. तुम्ही जिंकले की मतदार याद्या चांगल्या. हरले की मतदार याद्यांचा घोळ, बोगस मतदार याद्या हे बोलत रहायचे. महाविकास आघाडीत प्रचंड धुसफूस आहे. काँग्रेसच्या चार नेत्यांची चार तोंडे वेगळ्या ठिकाणी आहेत. या मोर्चात काही दम नाही हे काँग्रेसलाही माहिती आहे, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.