“उद्धव ठाकरे अन् शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 16:15 IST2024-06-20T16:14:48+5:302024-06-20T16:15:46+5:30
BJP Chandrashekhar Bawankule News: मविआत मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. खोटारडेपणावर यांना मते मिळाली, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

“उद्धव ठाकरे अन् शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी”; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
BJP Chandrashekhar Bawankule News: आताच्या घडीला ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण होण्यासाठी राज्य सरकारला १३ तारखेपर्यंतची मुदत दिली असून, दुसरीकडे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू आहे. यातच उद्धव ठाकरे आणि शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी असल्याची टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरेंच्या भाषणाला लोक कंटाळले. ते जे काही बोलत आहेत, ते फक्त मनोरंजन आहे. उद्धव ठाकरे कुठे, पंतप्रधान मोदी कुठे आणि देवेंद्र फडणवीस कुठे? ते अडीच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांनी काय काम केले, ते सांगावे. टोमणे मारुन महाराष्ट्र पुढे जाणार नाही. सकाळचा भोंगा राजकीय असतो. भोंगे न वाजवता शेतकऱ्यांच्या विकासासाठी काय करता ते जरा सांगावे. राजकीय भाषणे करायची, खोटे नरेटिव्ह तयार करायचे. आता कुठला मुद्दा घेणार? उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे काय केले ते सांगावे? आत्ताची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर होईल तेव्हा उद्धव ठाकरे काय सांगू शकणार, असा सवाल बावनकुळे यांनी केला.
उद्धव ठाकरे आणि शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी
उद्धव ठाकरे आणि शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत. आता तेच मराठा आरक्षणाबाबत बोलत आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि लोकांना दूर नेण्याचे काम चालले आहे. सरकारला क्रेडिट द्यायचे नाही पण विकासाची कामे डायव्हर्ट करत आहेत. मविआत मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार आहेत. नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांना वाटते की, ते मुख्यमंत्री होतील. तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघांनीही वाटते की, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
दरम्यान, खटाखट खटाखट साडेआठ हजार रुपये देऊ हे खोटे बोलले. संविधान बदलणार हे खोटे बोलले. आदिवासी समाजाला सांगितले की, तुमचे हक्क काढणार असे सगळे खोटे बोलून हे निवडून आले. खोटारडेपणावर यांना मते मिळाली. जिथे खासदार निवडून आलेत तिथे साडेआठ हजार रुपये देणार होते. आता ३१ जागी त्यांनी साडेआठ हजारांचे वाटप सुरु करावे, या शब्दांत चंद्रशेखर बावनकुळे यांनी हल्लाबोल केला.