“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 19:20 IST2025-04-25T19:17:29+5:302025-04-25T19:20:18+5:30

BJP Chandrashekhar Bawankule News: देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे.

bjp chandrashekhar bawankule claims that devendra fadnavis will be the chief minister till 2034 | “२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित

“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित

BJP Chandrashekhar Bawankule News: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला न भूतो असे यश मिळाले. त्यातही भाजपा पक्ष क्रमांक एकचा पक्ष ठरला. परंतु, यानंतर शपथविधीपासून ते मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत अनेक टप्प्यांवर महायुतीत मानापमान नाट्य घडल्याचे पाहायला मिळाले. पालकमंत्रीपदावरून महायुतीत असलेली धुसपूस अद्यापही शमलेली नाही. यातच महायुतीतील घटक पक्ष एकमेकांवर कुरघोडी करायची एकही संधी सोडत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जाते. यातच आता भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे भाकित केले आहे. 

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भाजपा नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन जम्मू काश्मीरला रवाना झाले. त्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला गेले. यावरून महायुतीत श्रेयवाद सुरू झाल्याची टीका होऊ लागली. यावरही बावनकुळे यांनी उत्तर दिले. पर्यटकांना सुखरूप आणण्याच्या प्रयत्नाला कोणी श्रेयवाद म्हणत असेल तर दुर्दैवाची बाब आहे. यात राजकारण करणे योग्य नाही, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील

एका सभेत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस २०२४ पर्यंत या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिनचे सरकारच महाराष्ट्राचे भले करू शकते.

दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काश्मीरला भेट दिली. यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी पहलगामला गेले चांगलेच आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन यातून पुढे जायच आहे. देश मजबूत करायच आहे. पाकिस्तानी नागरिकांबाबत केंद्र सरकारने जो निर्णय घेतला आहे तो देशाकरता महत्त्वाचा आहे. या देशाला अखंड ठेवण्याकरता महत्त्वाचा आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा तंतोतंत पालन राज्य सरकार करेल, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: bjp chandrashekhar bawankule claims that devendra fadnavis will be the chief minister till 2034

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.