Maharashtra Politics: “काँग्रेस-राष्ट्रवादी हे शिवसेनेला ‘टकमक टोकाकडे’ घेऊन जात आहेत, जनतेकडूनच कडेलोट अटळ”
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 11:01 IST2023-01-03T10:58:50+5:302023-01-03T11:01:13+5:30
Maharashtra News: छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवारांची पाठराखण? या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून "अण्णाजी पंत" यांनी लिहीलेय?

Maharashtra Politics: “काँग्रेस-राष्ट्रवादी हे शिवसेनेला ‘टकमक टोकाकडे’ घेऊन जात आहेत, जनतेकडूनच कडेलोट अटळ”
Maharashtra Politics: राष्ट्रवादीचे नेते, आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचे पडसाद अद्यापही उमटताना दिसत आहेत. भाजप, शिंदे गट यावरून अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत. तर, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून या टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच आता भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे.
आशिष शेलार यांनी एकामागून एक ट्विट करत गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून चांगलाच हल्लाबोल केला आहे. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते- अजित पवार, औरंगजेब क्रूर, हिंदूद्वेष्टा नव्हता - जितेंद्र आव्हाड, दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकांच्या पक्षाच्या नेत्यांची ही विधाने महाराष्ट्राने हलक्यात घ्यावी का? ही एक "औरंगजेबी" चाल तर नाही ना? अशी विचारणा आशिष शेलार यांनी केली आहे.
या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून "अण्णाजी पंत" यांनी लिहीलेय?
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तीनचाकी सरकार आल्यापासून नियोजनबद्ध कट रचलाय? म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवार यांची आज सामनाने पाठराखण केलेय? या कटाची स्क्रिप्ट प्रभादेवीच्या कार्यालयात बसून "अण्णाजी पंत" यांनी लिहीलेय? अशी प्रश्नांची सरबत्ती आशिष शेलार यांनी ट्विटरवरून केली आहे. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघे मिळून शिवसेनेला "टकमक टोकाकडे" घेऊन जात आहेत! आपल्या राजकीय स्वार्थासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याचा अपमान करणाऱ्या या सगळ्यांचा जनतेकडूनच कडेलोट अटळ आहे, असा इशाराही आशिष शेलार यांनी दिला.
दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाडांवर टीकास्त्र सोडले. जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या सोयीने इतिहास मांडतात, असा आरोप करत, जितेंद्र आव्हाड यांनी आता औरंगजेबाचे मंदिर उभारावे आणि उद्घाटनाला अजित पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना बोलवावे, असा खोचक टोला नरेश म्हस्के यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"