Akola Politics: राजकारणात काहीही शक्य! अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम सत्तेसाठी आले एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:33 IST2026-01-07T16:30:00+5:302026-01-07T16:33:36+5:30
Akot Municipal Council Election: अकोल्यात भाजपने थेट असदुद्दीन ओवेसींच्या पक्षाशी हातमिळवणी केल्याने संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.

Akola Politics: राजकारणात काहीही शक्य! अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम सत्तेसाठी आले एकत्र
एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू मानले जाणारे भाजप आणि एआयएमआयएम यांनी चक्क एकत्र येत अकोल्यात सत्ता स्थापन केली आहे. 'बटेंगे तो कटेंगे' आणि प्रखर हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या भाजपने थेट असदुद्दीन ओवेसींच्या पक्षाशी हातमिळवणी केल्याने संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.
काय आहे सत्तेचे समीकरण?
अकोट नगरपरिषदेच्या ३५ पैकी ३३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. भाजप ११ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र सत्तेसाठी आवश्यक असलेला आकडा त्यांच्याकडे नव्हता. अशा परिस्थितीत भाजपने एक अनपेक्षित मास्टरस्ट्रोक खेळला. भाजपने अकोट विकास मंच नावाची महाआघाडी स्थापन केली असून, यामध्ये चक्क एमआयएमचा समावेश केला आहे. या युतीची औपचारिक नोंदणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
अकोट नगरपरिषदेत कुणी किती जागा जिंकल्या?
अकोट नगरपरिषदे निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ११ जिंकल्या आणि एमआयएमने पाच जागेवर विजय मिळवला. तर, प्रहार जनशक्ती पक्षाने तीन जागा, उद्धवसेना दोन जागा, राष्ट्रवादी (अजित पवार) दोन जागा, शिंदेसेना दोन जागा, राष्ट्रवादी (शरद पवार) एक जागा, काँग्रेस दोन जागा आणि वंचित बहुजन आघाडीने दोन जागा जिंकल्या. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी पक्षाला २५ जागा जिंकणे आवश्यक होते. त्यामुळे भाजपने काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी वगळता इतर सर्व पक्षांसोबत युती केली.
अकोटमध्ये राजकीय भूकंप!
ही युती राजकीय विश्लेषकांसाठी आश्चर्याचा धक्का मानली जात आहे. कारण, भाजप हिंदुत्वाचा पुरस्कार करतो तर, एमआयएम मुस्लिम हितसंबंधांवर बोलते. विधानसभा निवडणुकीत भाजपने 'बटेंगे तो कटेंगे' असा नारा दिला होता, मग आता ओवेसींच्या पक्षाशी युती कशी? असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. तसेच भाजपवर दुटप्पी भूमिकेचा आरोप करण्यात आला आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या माया धुळे यांनी एमआयएमच्या उमेदवार फिरोजाबी सिकंदर राणा यांचा ५ हजार २७१ मतांनी पराभव केला. मात्र, परिषद चालवण्यासाठी भाजपने पराभूत झालेल्या याच एमआयएमला आपला सत्ता भागीदार बनवले. ज्या एमआयएमविरुद्ध भाजपने निवडणूक लढवली, आता त्याच पक्षाचे झेंडे विकासाच्या नावाखाली भाजपसोबत फडकत आहेत.