The birthplace of Sai Baba is Pathari, claims | साईबाबांची जन्मभूमी पाथरीच, पाथरीकरांचा दावा

साईबाबांची जन्मभूमी पाथरीच, पाथरीकरांचा दावा

- विठ्ठल भिसे
पाथरी (जि़ परभणी) : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान श्री साईबाबा यांची पाथरी हीच जन्मभूमी असून, या संदर्भात अनेक पुरावे उपलब्ध असल्याचा दावा पाथरीकरांनी केला आहे. खुद्द शिर्डी संस्थानने १९७४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या इंग्रजी साई सचरित्रामध्येच साई बाबांचा जन्म हा पाथरीत झाल्याचा उल्लेख आहे.

पाथरी येथील साई जन्मभूमी विकास आराखड्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटींच्या निधीची मंजुरी दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. पाथरी हीच साई बाबा यांची जन्मभूमी आहे़, असा दावा पाथरीकरांनी केला आहे़ या संदर्भात पाथरीकरांकडून श्री साई बाबा यांच्या जन्मासंदर्भातील पुरावेही देण्यात येत आहेत. 

परभणी जिल्ह्यातील मानवत रोड रेल्वे स्टेशनपासून १८ कि.मी.वर असलेल्या पाथरी येथे श्री सार्इंचा जन्म झाल्याचे संशोधन १९७५ मध्ये सर्वप्रथम समोर आले. मुंबई येथील साई भक्त विश्वास खेर यांनी हे संशोधन करण्यासाठी २५ वर्षे खर्ची घातली. १९७८ साली साई संस्थानच्या नावाने त्यांनी विश्वस्त मंडळाची स्थापना करून पाथरी ही श्री सार्इंची जन्मभूमी असल्याचे सांगितले़ विश्वास खेर यांनी पाथरी येथील साईभक्त दिनकरराव चौधरी यांची १९७५ ते ७८ दरम्यान भेट घेतली़ तसेच पाथरी येथील साई बाबांच्या सहवासात आलेल्या अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या. त्यात साईबाबांचे वास्तव्य कुठे होते हे सांगण्यात आले़ साई बाबांचा प्रचार करणारे संत दासगणू महाराज यांची प्रत्यक्ष भेट घेऊन खेर यांनी त्यांच्याशी चर्चा केली.  त्यावेळीही साई बाबांचे जन्मस्थळ पाथरीच असल्याची बाब समोर आली़ तसेच पाथरी येथील साई बाबांचे जन्म ठिकाण असलेल्या जागेत उत्खनन करताना अनेक वस्तू सापडल्या़ त्यामध्ये धान्य दळण्यासाठीचे जाते, दिवे लावण्यासाठीच्या खापराच्या पणत्या, पुजेची भांडी आणि इतर वस्तुंचा समावेश आहे़

बी़व्ही़ नृसिंह स्वामी यांनी लिहिलेल्या ‘डिवाईन आॅफ साईबाबा भाग १’ या ग्रंथात साई बाबा यांच्या पाथरी येथील जन्माचा उल्लेख आहे़ प्रातिनिधी स्वरुपातील हे काही पुरावे असले तरी जवळपास २९ पौराणिक पुरावे पाथरीकरांकडे उपलब्ध असून, हे सर्व पुरावे जगजाहीर असल्याचे संस्थानचे विश्वस्त संजय भुसारी यांनी सांगितले़
संस्थानचे अन्य एक विश्वस्त तथा कृती समितीचे अध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी म्हणाले की, ३० वर्षांपूर्वी पाथरीतील १०० वर्षांच्या तत्कालीन साईभक्त मदार नाना यांनी पाथरी हीच साईबाबांची जन्मभूमी असल्याचे सांगितले होते़

शिर्डीकरांना भीती
पाथरीतील साई जन्मभूमीचा विकास झाल्यास भक्तांचा पाथरीकडे ओढा वाढेल, अशी भीती शिर्डीकरांना वाटत आहे़ त्यातूनच त्यांनी पाथरी जन्मभूमीच्या विकासाला विरोध सुरू केला आहे.
- आ़ बाबाजानी दुर्राणी, साई संस्थान विश्वस्त
तथा कृती समितीचे अध्यक्ष

Web Title: The birthplace of Sai Baba is Pathari, claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.