अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:57 IST2025-11-15T11:56:29+5:302025-11-15T11:57:11+5:30
पक्षाच्या चिन्हावर बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या निर्णयापासून अजित पवारांनाच अंधारात ठेवले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे

अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
मुंबई - बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत भाजपा-जेडीयू यांच्या नेतृत्वात एनडीएने दमदार कामगिरी केली आहे. परंतु महाराष्ट्रात एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही बिहारची निवडणूक स्वबळावर लढवली होती. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उभ्या केलेल्या या उमेदवारांना अत्यंत नगण्य मतदान झाले. सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. पक्षावर ओढावलेल्या या नामुष्कीबाबत पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेले उत्तर धक्कादायक होते. या उत्तरामुळे अजित पवारांना न सांगताच बिहारची निवडणूक राष्ट्रवादीने लढवली का असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवर अजित पवार म्हणाले की, बिहार निवडणुकीत उमेदवार उभे करू नका असं मी सांगितले होते. त्यानंतरच्या काळात आमच्या इथं वरिष्ठ पातळीवर प्रफुल पटेल यांनी काही निर्णय घेतले. मी तिथे जास्त लक्ष दिले नव्हते, मी महाराष्ट्रात होतो. त्यामुळे मला त्याबाबत अधिकची माहिती नाही असं विधान त्यांनी केले आहे. त्यामुळे पक्षाच्या चिन्हावर बिहार विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याच्या निर्णयापासून अजित पवारांनाच अंधारात ठेवले का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. राष्ट्रवादीने बिहारमध्ये १६ जागांवर उमेदवार उभे केले होते.
बिहारमध्ये राष्ट्रवादीची काय झाली अवस्था?
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बिहार निवडणुकीत उमेदवार उभे केले होते. परंतु, यातील एकाही उमेदवाराला दखलपात्र कामगिरी करता आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले. राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांना ५०० मतेही मिळाली नाहीत. सासाराम विधानसभा मतदारसंघात आशुतोष सिंह यांना केवळ ११२ मते पडली. जिथे नोटालाही ३७० हून अधिक मते पडली आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार, जर एखाद्या उमेदवाराला मतदारसंघातील एकूण मतांच्या १६ टक्के मते पडली नाही तर त्याचे डिपॉझिट जप्त होते.
बिहारमध्ये NDA ची जबरदस्त कामगिरी
स्वातंत्र्यानंतरचा सर्वाधिक मतदानाचा विक्रम नोंदविणाऱ्या बिहारमध्ये मतदारांनी मुख्यमंत्री नितीश कुमार, त्यांचा युनायटेड जनता दल, भारतीय जनता पक्ष व या सर्वांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर पुन्हा, तोदेखील अधिक विश्वास टाकला आहे. २४३ सदस्यांच्या विधानसभेत पंधरा वर्षांनंतर आघाडीने दोनशेच्या जवळ नेले आहे. बिहारच्या इतिहासात भारतीय जनता पक्ष प्रथमच पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. गेल्या, २०२० च्या निवडणुकीत नितीश कुमार भाजपसोबत होते. रालोआला १२२ जागांचे काठावरचे बहुमत मिळाले. नंतर नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली. दोन वर्षांनंतर तेजस्वीऐवजी भाजपसोबत संसार मांडला होता.