शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 14:09 IST2025-06-10T14:06:50+5:302025-06-10T14:09:53+5:30
NCP Sharad Pawar Group Satyajit Patankar Joins BJP: भाजपा शिस्तीने चालणारा पक्ष आहे. गावागावात जाऊन काम करायचे आहे. तालुक्याचे भवितव्य ठरवण्यासाठी भाजपामध्ये आलो, अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी पक्षप्रवेशावेळी दिली.

शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
NCP Sharad Pawar Group Satyajit Patankar Joins BJP: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटून दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे दोन्ही गट त्यांचा २६ वा वर्धापन दिन साजरा करत आहेत. एकीकडे काका-पुतण्या एकत्र येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच दुसरीकडे मात्र शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. पुण्यात वर्धापन दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच एका बड्या नेत्याने भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटाला पक्षाच्या वर्धापनदिनीच साताऱ्यात मोठा धक्का बसला आहे. पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना आणि भाजपा यांच्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
भाजपा शिस्तीने चालणारा पक्ष, शिस्तीने चाललो नाही म्हणून पराभव
भाजपा शिस्तीने चालणारा हा पक्ष आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. शिस्तीने चालत नव्हतो, म्हणूनच आपला पराभव होत होता. आपल्या तालुक्याचे भवितव्य ठरवण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आपल्या तालुक्यातील अनेक प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. निवडणुका तोंडावर वेळ कमी आहे. शेतकरी कामात व्यस्त असतात. गावागावात जाऊन पक्षाचे काम करायचे आहे, असे सत्यजित पाटणकर यांनी यावेळी सांगितले. या पक्षप्रवेशावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावच्या सरपंच सारिका योगेश पाटणकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, सत्यजीत पाटणकर यांच्या रुपाने साताऱ्यातून भाजपमध्ये हाडामासाचा पदाधिकारी सहभागी होत आहे, याचा आनंद आहे. सरकारच्या योजना प्रामाणिकपणे राबवणारा हा पक्ष आहे. आपण ज्या विश्वासाने पक्षात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी गॅरंटी रवींद्र चव्हाण यांनी दिली. तसेच विटा, सांगली येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वैभव पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.