छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 14:16 IST2026-04-11T14:12:25+5:302026-04-11T14:16:40+5:30
Chhagan Bhujbal Helicopter Landing News: या धक्कादायक प्रकरानंतर एकच खळबळ उडाली.

छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Chhagan Bhujbal Helicopter Landing News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे. एका कार्यक्रमाला जात असताना छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर भलत्याच ठिकाणी उतरल्याचे समजते. हेलिकॉप्टर लँड करताना पायलटकडून मोठी चूक झाल्याची माहिती आहे. यावेळी जरा इकडे तिकडे झाले असते, तर मोठा अनर्थ ओढवला असता, असे म्हटले जात आहे. या प्रकारातून छगन भुजबळ थोडक्यात बचावल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री हे महात्मा फुले जयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात असलेल्या खानवाडी या गावात आयोजित कार्यक्रमासाठी जात होते. हेलिकॉप्टरने छगन भुजबळ या कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असताना लँडिंगदरम्यान मोठी चूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नियोजित हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याऐवजी पायलटने ते थेट कार पार्किंगच्या जागेत उतरवल्यामुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
कार पार्किंगची जागा हेच हेलिपॅड वाटले...!!!
या गावातील कार्यक्रमासाठी स्वतंत्र हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, हेलिकॉप्टरच्या पायलटला कार पार्किंगमधील मोकळी जागा हेच हेलिपॅड असल्याचे वाटले आणि त्या मोकळ्या जागेतच पायलटने हेलिकॉप्टर उतरवले. या अनपेक्षित प्रकारामुळे उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पार्किंगमध्ये काही वाहने उभी असली तरी कोणालाही गंभीर दुखापत झाल्याची नोंद नाही.
स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला
या ठिकाणी असलेल्या पोलिसांनी पायलटला योग्य माहिती दिल्यानंतर हेलिकॉप्टर तिथून हलवण्यात आले. या घटनेनंतर स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. योग्य नियोजन असतानाही चुकीच्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवणे अत्यंत धोकादायक आहे. विशेषतः लोकवस्तीच्या जवळ अशा प्रकारची चूक मोठ्या अपघातास कारणीभूत ठरू शकली असती, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी
छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलीकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. त्यामुळेच मी सातत्याने सांगतोय की, महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टरर्समध्ये देखभालदुरुस्तीसह इतरही अनेक त्रुटी आहेत. आज सुदैवाने अपघात टळला पण म्हणून शासनानेही एवढा हलगर्जीपणा करणं योग्य नाही. विमान, हेलीकॉप्टर्सने प्रवास करताना सरकार यापुढे काळजी घेईल, ही अपेक्षा!, अशी पोस्ट आमदार रोहित पवार यांनी एक्सवर केली आहे.
दरम्यान, मंत्री छगन भुजबळ सुरक्षित असून, त्यांनी आपला नियोजित कार्यक्रम पूर्ण केला. परंतु, प्रशासनाकडून आता या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हेलिपॅड स्पष्ट दिसत होते की नाही, पायलटकडून नेमकी चूक कशी झाली किंवा काही तांत्रिक अडचण होती का, याचा तपास केला जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
मा. छगन भुजबळ साहेब यांच्यासारख्या मोठ्या नेत्याचं हेलीकॉप्टर हेलिपॅडऐवजी अचानक एका पार्किंगमध्ये उतरवण्यात आल्याची बाब ही अतिशय गंभीर आहे. त्यामुळंच मी सातत्याने सांगतोय की, महत्त्वाच्या व्यक्तींनी प्रवास करताना काळजी घ्यायला हवी. अनेक विमानं आणि हेलिकॉप्टरर्समध्ये…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 11, 2026