मोठी बातमी: धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंचा पत्ता कट?; अजित पवार बीडचं पालकमंत्रिपद घेण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 14:28 IST2025-01-03T14:26:34+5:302025-01-03T14:28:12+5:30

Beed: राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: बीडचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे.

Big news set back for Dhananjay Munde Pankaja Munde Ajit Pawar likely to take over as guardian minister of Beed | मोठी बातमी: धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंचा पत्ता कट?; अजित पवार बीडचं पालकमंत्रिपद घेण्याची शक्यता

मोठी बातमी: धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंचा पत्ता कट?; अजित पवार बीडचं पालकमंत्रिपद घेण्याची शक्यता

NCP Ajit Pawar: केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्या प्रकरणासह पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी हे राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने मुंडे यांना मंत्रि‍पदावरून हटवा, अशी मागणी जोर धरत आहे. तर दुसरीकडे, बीडमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मुंडे बहीण-भावाला न देता महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी कोणीही घ्यावं, अशी मागणी जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: बीडचे पालकमंत्री होण्याची शक्यता आहे.

बीडच्या पालकमंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेतून बीडचं पालकमंत्रिपद धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांना न देण्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये एकमत झाले असल्याचे समजते. जिल्ह्यात घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींवर अंकुश ठेवण्यासाठी बीडचं पालकमंत्रिपद अजित पवार स्वत:कडे घेऊ शकतात. याबाबत 'न्यूज१८ लोकमत'ने वृत्त दिलं आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराला दोन आठवडे उलटल्यानंतरही राज्यात अद्याप पालकमंत्र्यांची घोषणा झालेली नाही. सत्ताधारी महायुतीत तीन पक्ष असल्याने कोणत्या पक्षाकडे कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद द्यायचं, याबाबत अजूनही खल सुरू आहे. येत्या काही दिवसांत याबाबतची घोषणा होण्याची शक्यता आहे.

मंत्रि‍पदाच्या राजीनाम्यावर धनंजय मुंडेंचं मत काय?

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना मी राजीनामा द्यावा तर का द्यावा, असा सवाल धनंजय मुंडे यांनी विरोधकांना केला आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला अटक झाली असली तरी  त्याला वाचविण्याचा प्रयत्न मुंडे करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्याला मुंडेंनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. "संतोष देशमुख यांची हत्या ज्यांनी केली त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी मी यापूर्वीच केली आहे. त्यामुळे कोणी काय बोलावे आणि कोणाचे काय होणार? याला काहीही अर्थ नाही," असं मुंडे म्हणाले.

Web Title: Big news set back for Dhananjay Munde Pankaja Munde Ajit Pawar likely to take over as guardian minister of Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.