मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 10:50 IST2025-12-18T10:38:56+5:302025-12-18T10:50:06+5:30
Pragya Satav Resignation: मराठवाड्यात काँग्रेसला भाजपाने मोठा धक्का दिला आहे. विधान परिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आता आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
मराठवाड्यात भाजपानेकाँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. आमदार प्रज्ञा सातव आज भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज त्यांनी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज विधिमंडळाच्या सचिवांकडे आपला राजीनामा दिला आहे. त्या आजच भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
आ.प्रज्ञाताई सातव ह्या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या अत्यंत जवळचे घराणे म्हणून सातव घराण्याची ओळख आहे. विधान परिषदेच्या सदस्य असलेल्या डॉ.प्रज्ञाताई सातव ह्या काँग्रेसकडून दोन टर्म आमदार आहेत.
मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये प्रज्ञा सातव या नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. काही दिवसांपासून त्या भाजपामध्ये प्रवेश करणार अशा चर्चा सुरू होत्या. आज अखेर त्यांनी काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आज गुरुवारी मुंबई येथे त्यांचा भाजप प्रवेश होईल. या प्रवेशासाठी बुधवारीच कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत.
२०३० पर्यंत आहे आमदारकीचा कार्यकाळ
स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. त्या सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष असून विधान परिषदेच्या आमदार आहेत. २०२१ साली शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मधील निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा एकदा विधान परिषदेवर त्यांची निवड झाली असून २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता.