पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड; अजितदादांचे पाच आमदार जयंत पाटलांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 19:07 IST2024-06-27T19:06:19+5:302024-06-27T19:07:16+5:30
Ajit Pawar Mla News: अजित पवार गटाचे काही आमदार लोकसभा निकालानंतर राजकीय करिअरच्या चिंतेत आहेत. यामुळे ते पुन्हा शरद पवारांच्या आश्रयाला येण्याची शक्यता आहे

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड; अजितदादांचे पाच आमदार जयंत पाटलांच्या भेटीला
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोठी घडामोड घडत आहे. अजित पवार गटाच्या चार ते पाच आमदारांनी शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंद खोलीत भेट घेतली आहे. यामुळे अजित पवार गटाचे १८-१९ आमदार शरद पवारांकडे परत येण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.
अजित पवार गटाचे काही आमदार लोकसभा निकालानंतर राजकीय करिअरच्या चिंतेत आहेत. यामुळे ते पुन्हा शरद पवारांच्या आश्रयाला येण्याची शक्यता आहे अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. यातच रोहित पवार, जयंत पाटलांनी ही तशी वक्तव्ये करण्यास सुरुवात केली होती. यावर शरद पवारांनीही ज्या आमदारांचे काम असेल, जे पक्षाला फोडणार नाहीत अशांनाच परत घेणार असल्याचे स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर आज अजित पवार गटाच्या चार ते पाच आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील आमदार असल्याचे समजते आहे. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. या भेटीवेळी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे व अनिल देशमुखही होते असे समजते आहे. या आमदारांपैकी दोन आमदार हे नाशिक भागातील असल्याचेही समजते आहे.
रोहित पवारांची प्रतिक्रिया बोलकी...
या भेटीवर रोहित पवारांनी भाष्य केले आहे. जयंत पाटलांना कधी कोणते कार्ड काढायचे हे चांगले माहिती आहे. ते अनुभवी नेते आहेत. ज्या आमदारांनी उन्माद केला, लोकभावनेच्या विरोधात भुमिका घेतलेली त्यांच्याबाबत शरद पवार नक्कीच निर्णय घेतील, असे रोहित पवार म्हणाले.