अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; पुणे, बीडच्या पालकमंत्रिपदी कुणाची वर्णी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 15:07 IST2026-02-03T15:07:10+5:302026-02-03T15:07:59+5:30

अजित पवारांच्या निधनानंतर पुणे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते.

Big decision of the state government after the death of Ajit Pawar; Appointed Sunetra Pawar the guardian minister of Pune, Beed | अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; पुणे, बीडच्या पालकमंत्रिपदी कुणाची वर्णी?

अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; पुणे, बीडच्या पालकमंत्रिपदी कुणाची वर्णी?

मुंबई - अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्यात शोककळा पसरली. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवारांसह ४ जणांचे दुर्दैवी निधन झाले. अजित पवारांच्या जाण्याने राष्ट्रवादीत नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली. मात्र अजितदादांवरील अंत्यसंस्कारानंतर वेगाने राजकीय घडामोडी घडल्या. त्यात सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करून त्यांचा उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी पार पडला. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री होतेच त्याशिवाय त्यांच्याकडे बीड आणि पुणे पालकमंत्रिपदाची जबाबदारीही होती. आता त्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी राज्य सरकारने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली आहे. पुणे जिल्ह्यावर अजितदादांचे विशेष प्रेम होते. त्यामुळे महायुतीसोबत आल्यानंतर सरकारमध्ये पुण्याची जबाबदारी अजितदादांनी घेतली होती. मात्र अजित पवारांच्या निधनानंतर पुणे, बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद रिक्त झाले होते. मात्र राज्य सरकारने सुनेत्रा पवार यांच्याकडे ही जबाबदारी दिल्याने यापुढच्या काळात पुणे, बीडमध्ये सुनेत्रा पवार या जबाबदारी सांभाळताना दिसतील. 

अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडे...

अजित पवार यांच्याकडे वित्त आणि नियोजन खात्याची जबाबदारी होती. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना कोणती खाती मिळतील याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. त्यात उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विभाग त्यांच्याकडे सोपवण्यात आले. परंतु अजितदादांकडे असलेले अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे ठेवले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. आत्ताच अजित पवारांचे निधन झाल्याने सुनेत्रा पवार यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यात अर्थसंकल्प केवळ भाषण वाचून दाखवायचे नाही तर सर्व विभागांशी चर्चा करून त्याचा आढावा घ्यावा लागेल. त्यानुसार बजेट तरतूद करावी लागेल. ही कामे आत्ताच सुनेत्रा पवारांवर टाकू शकत नसल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडण्याचे ठरवले आहे. अधिवेशन संपल्यानंतर पुढील निर्णय चर्चा करून ठरवू असं फडणवीसांनी सांगितले आहे.
 

Web Title : अजित पवार के निधन के बाद सुनेत्रा पवार को मिली पुणे, बीड की जिम्मेदारी।

Web Summary : अजित पवार के दुर्भाग्यपूर्ण निधन के बाद, सुनेत्रा पवार को पुणे और बीड जिलों की जिम्मेदारी सौंपी गई है। वह उत्पादन शुल्क, खेल और अल्पसंख्यक मामलों का भी प्रबंधन करेंगी। मुख्यमंत्री फडणवीस ने आगामी बजट के कारण अस्थायी रूप से वित्त विभाग अपने पास रखा है।

Web Title : Sunetra Pawar to helm Pune, Beed after Ajit Pawar's demise.

Web Summary : Following Ajit Pawar's unfortunate death, Sunetra Pawar has been assigned responsibility for Pune and Beed districts. She will also handle production excise, sports, and minority affairs. Chief Minister Fadnavis retains finance temporarily due to upcoming budget.