भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 12:47 IST2025-11-26T12:40:33+5:302025-11-26T12:47:42+5:30
संजय शिरसाट यांनी स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करत अप्रत्यक्षपणे चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली.

भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
Sanjay Sirsat on Ashok Chavan: गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील नेत्यांमध्ये टोकाचे वाक्युद्ध सुरू झाले असून, महायुतीत फूट पडल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि शिवसेना (शिंदे गट) नेते संजय शिरसाट यांनी थेट भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर त्यांच्याच भोकर मतदारसंघात जाहीर सभेत बोलताना जोरदार टीकास्त्र सोडले.
"भाकरी खाता की नोटा?
भोकर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने आयोजित प्रचार सभेत बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी अशोक चव्हाण यांच्या संपत्तीवरून आणि मालमत्तेवरून त्यांना थेट सवाल केला. "एवढ्या सगळ्या एजन्सी घेऊन काय करता, इतका पैसा कशाला पाहिजे? भाकरी खाता की नोटा?" असा सवाल संजय शिरसाट यांनी केला. शिरसाट यांनी उघडपणे अशोक चव्हाण यांच्याकडे असलेल्या विविध एजन्सी आणि संपत्तीच्या आधारावर निशाणा साधला. यावेळी शिरसाट यांनी अशोक चव्हाण यांच्यावर वैयक्तिक टीका करताना म्हटले की, "घरात पंधरा माणसे असली असती तर वाटण्या झाल्या असत्या आणि आपल्या वाट्याला काही येणार नाही असे असेल तर समजू शकलो असतो."
यावेळी शिरसाट यांनी स्वतःचा प्रामाणिकपणा सिद्ध करत अप्रत्यक्षपणे चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली. "संजय शिरसाट टाईट राहतो, सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. माझा फ्लॅट आहे, काय आहे ते मी दाखवतो. आपण कुणाला घाबरत नाही, प्रामाणिकपणे काम करतो. कुणाचे हरामाचे पैसे खात नाही," अशा शब्दांत शिरसाट यांनी स्वतःची बाजू मांडली.
'नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही'
शिरसाट यांनी यावेळी काँग्रेसचे दिवंगत मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यावरही टीका केली. "शंकरराव चव्हाण म्हणायचे नांदेडला लंडन बनवणार. मी दोन-तीन वेळा नांदेडला आलो, पण मला काही बदल दिसला नाही. आज तर मी त्यांच्या मतदार संघातील गावात आलो आहे. मला वाटले हे गाव तरी चांगले असेल, पण काही नाही. ज्या लोकांनी एवढं मोठं राजकारण केलं, काम केलं... ज्यांच्या आदर्शावर आम्ही राजकारण करतो ते गाव सर्वात सुंदर असेल असे वाटले होते," अशा खोचक शब्दांत शिरसाट यांनी टीका केली.
'रिक्षा चालवणारे सगळे मंत्री झालो'
"फक्त एकनाथ शिंदे रिक्षा चालवत नव्हते, मीही रिक्षा चालवत होतो, भाजपचे बावनकुळे, प्रताप सरनाईक हेही रिक्षा चालवत होते. आमची रिक्षा चालवणाऱ्यांची एक मोठी युनियन आहे. आम्ही सगळे मंत्री झालो," असेही शिरसाट म्हणाले.