धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 20:25 IST2025-01-14T20:25:12+5:302025-01-14T20:25:34+5:30
बीड प्रकरणात जे म्हणणं आहे त्याबाबत भूमिका मांडू असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.

धनंजय मुंडे अजित पवारांना १० मिनिटे भेटले अन् परळीला रवाना झाले; काय घडलं?
मुंबई - बीड हत्याकांड आणि खंडणी प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. आज वाल्मिक कराडला कोर्टात हजर करण्यात आले त्यावेळी त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. कराडला एसआयटीच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे परळीत वातावरण बिघडलं आहे. वाल्मिक कराड समर्थकांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला. याच घडामोडीत मुंबईत मंत्री धनंजय मुंडे यांनी देवगिरी निवासस्थानी जात उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीला विशेष महत्त्व होते परंतु अवघ्या १० मिनिटांत ही बैठक संपवून धनंजय मुंडे परळीच्या दिशेने रवाना झाले. परळीतील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता धनंजय मुंडे यांनी परळीला जाण्याचा निर्णय घेतला आहे. परळीत सध्या मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. बीड शहर पोलीस स्टेशनबाहेर सकाळपासून मोठ्या संख्येने कराड समर्थक जमले होते. वाल्मिक कराडची आई आणि पत्नीसह इतर महिला ठिय्या आंदोलनासाठी बसल्या होत्या. वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी करत समर्थकांनी परळी बंदचीही हाक दिली होती. त्यात कराड समर्थकांमधील २ तरुणांनी अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला परंतु त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळला.
परळीत कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आणि तणाव निर्माण झाला असून त्याच बाबतीत धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची भेट घेऊन माहिती दिली. अजित पवारांना परळीतील स्थितीचा आढावा देऊन धनंजय मुंडे परळीच्या दिशेने रवाना झालेत. पुढील २ दिवसांनी परळीतील परिस्थिती शांत झाल्यानंतरच माध्यमांशी संवाद साधला जाईल. बीड प्रकरणात जे म्हणणं आहे त्याबाबत भूमिका मांडू असं धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
आज दिवसभरात काय घडलं?
मस्साजोग येथील आवादा ऍनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांना २ कोटी रुपयाची खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याच्या दिलेल्या धमकी प्रकरणी वाल्मिक कराड १५ दिवस पोलीस कोठडीत होता. आज मंगळवारी दुपारी केज येथील न्यायालयात हजर केले असता, दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश दिशांत गोळे यांनी त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी मिळताच वाल्मिक कराडला मकोका लागल्यामुळे पुढील तपास करण्यासाठी त्याला आमच्या ताब्यात देण्यात यावे. असा अर्ज 'एसआयटी'च्या अधिकाऱ्यांनी केला. यातच परळीत वाल्मिक कराड समर्थकांनी बीड शहर पोलीस ठाण्याबाहेर जमून घोषणाबाजी केली. काही समर्थकांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला.