"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 19:30 IST2025-09-17T19:30:07+5:302025-09-17T19:30:44+5:30
Beed-Ahilyanagar railway : "आम्ही समाजाचे भले करायला आलो आहेत. देशाचे पंतप्रधान आमच्या पाठीशी आहेत. केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहेत...."

"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
गेल्या तब्बल ४० वर्षांपासून रखडलेले बीडकरांचेरेल्वेचे स्वप्न आज अखेर पूर्ण झाले. बीड जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. बीड-अहिल्यानगर रेल्वे सेवेला आजपासून प्रारंभ झाला. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांमधील 'अती उत्साहीं'ना चांगलेच झापल्याचे दिसून आले. 'तुम्ही आज असे चेकाळला आहात की, तुमचे नेते उठले की, ह्या.. हू..., काय तुम्ही? कधी रे सुधारणार तुम्ही?' अशा शब्दांत अजित पवार यांनी या चकाळणाऱ्यांचे कान टोचले.
सवयी चांगल्या लावा... -
अजित पवार म्हणाले, "आज मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर, आजच्याच दिवशी फक्त मोफत प्रवास करायचा आहे. परत तिकीट काढून प्रवास करायचा. नाही तर म्हणाल, त्या दिवशी आम्हाला फुकट दिलं आणि आता काय पैसे घेताय? आजच्या दिवसापुरताच आहे, कारण आज उद्घाटन आहे. त्यामुळे सवयी चांगल्या लावा.
"ह्या.. हू..., काय तुम्ही? कधी रे सुधारणार तुम्ही?" -
अजित दादा पुढे म्हणाले "मी मघापासून बघतोय... मी महाराष्ट्रात फिरत असतो, वेगवेगळ्या भागांत जात असतो. पण तुम्ही आज असे चेकाळला आहात की, तुमचे नेते उठले की, ह्या.. हू..., काय तुम्ही? कधी रे सुधारणार तुम्ही? परत मग मी बोललो की, दादा आले आणि आम्हाला बोलले. अरे जग कुठे चाललंय? इतर देश कुठे चालले? इतर राज्य कुठे चाललीत? आपण जरा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा. कशामध्ये आपण वाद घालतोय? कशा करता समाजा-समाजात तेढ निर्माण करता? अरे आपण सगळे माणूस आहोत, माणूस माणुसकी दाखवा."
देशाचे पंतप्रधान आमच्या पाठीशी -
"शेवटी महायुती सरकारला सर्व जाती धर्माला न्याय द्यायचा आहे. आम्ही जाती पातीचे राजकारण करायला आलेलो नाहीत. आम्ही समाजाचे भले करायला आलो आहेत. देशाचे पंतप्रधान आमच्या पाठीशी आहेत. केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहेत. राज्याचे मुख्यमंत्री सातत्याने काम करत आहेत. कुठल्याही विकास कामासंदर्भात कुणी काही अडथळा आणला, तर अधिकाऱ्यांना सांगतात इथे राजकारण करायचे नाही. इथे समाजाचे हीत बघायचे आहे. या पद्धतीने काम सुरू आहे," असेही अजित दादा यावेळी म्हणाले.