अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 10:07 IST2025-08-17T10:03:14+5:302025-08-17T10:07:41+5:30

Anna Hazare Pashan Pune Banner News: कुंभकर्णसुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता. तुम्ही आपल्या देशासाठी आतातरी उठा. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे, असा टोला लगावणारा बॅनर लावण्यात आला आहे.

banner in pashan pune about anna hazare and appeal to awake and andolan against vote stolen | अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?

अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?

Anna Hazare Pashan Pune Banner News: एकीकडे मतचोरी प्रकरणी राहुल गांधी चांगलेच आक्रमक झाले असून, यावरून विरोधकांकडून रान पेटवले जात आहे. दुसरीकडे, सत्ताधारी आणि निवडणूक आयोग विरोधकांचे दावे खोडून काढत आहेत. केवळ राजकीय वर्तुळात नाही, तर सोशल मीडियावरही राहुल गांधी यांनी मतचोरी आणि मतदारयाद्यांमधील घोळ दाखवून दिल्याप्रकरणी चर्चा झडत असून, अनेक जण राहुल गांधी यांच्या विधानातील विरोधाभास दाखवून देत आहेत. अशातच अण्णा हजारे यांच्या नावाचा एक बॅनर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

भारतातील भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा प्रमुख चेहरा म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे पाहिले जाते. अण्णा हजारे बऱ्याच दिवसांपासून आंदोलनापासून दूर आहेत. भारतात सत्तांतर करण्यास अण्णा हजारे यांनी केलेले आंदोलन कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे २०१४ च्या आधी अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता. बराच काळ प्रत्यक्ष आंदोलनांपासून दूर राहिलेले अण्णा हजारे पुन्हा सक्रीय कधी होणार अशी चर्चा कायमच सुरू असते. पुन्हा एकदा पुणेकरांनी बॅनर लावत अण्णा हजारेंना प्रश्न विचारला आहे.

मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?

पुण्याच्या पाषाण भागात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना बॅनरच्या माध्यमातून पुणेरी स्टाइलने टोले लगावण्यात आले आहेत. 

अण्णा आतातरी उठा...

कुंभकर्णसुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता. 

तुम्ही आपल्या देशासाठी आतातरी उठा... 

होय मतांची चोरी झालेली आहे... India Against Votechori... 

देशात मतांची चोरी होत असताना,
देशात भ्रष्टाचार फोफावला असताना,
देशात हुकूमशाही माजलेली असताना,
देशाची लोकशाही धोक्यात असताना.
अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?

अण्णा, दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे. 

अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पाषाण भागातील सामाजिक कार्यकर्ते समीर उत्तरकर यांनी हे बॅनर्स आपल्या नावासह लावले असून सध्याच्या राजकीय परिस्थितीवर, मतचोरीवर अण्णांनी बोलावे, आंदोलन करावे, अशी मागणी या बॅनरमधून करण्यात आली आहे.

दरम्यान, बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेमुळे नागरिकांच्या हक्कावर गदा येत असल्याचा आरोप करत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सासराम येथून 'व्होट अधिकार यात्रा' सुरू करणार आहेत. मतचोरीच्या प्रकारांविरोधात जनता जागी झाली आहे, असे वक्तव्य केलेला नवा व्हिडीओ त्यांनी समाजमाध्यमावर पोस्ट केला आहे. राहुल गांधी यांनी एक्सवर प्रसारित केलेल्या 'लापता व्होट' या व्हिडीओत म्हटले आहे की, आता कोणीही चोरी चोरी - चुपके चुपके काहीही गैरप्रकार करू शकणार नाही. जनता जागी झाली आहे. नागरिकांच्या मतांची चोरी म्हणजे त्यांच्या हक्कांचीच चोरी आहे. या विरोधात आवाज उठवू या.

 

Web Title: banner in pashan pune about anna hazare and appeal to awake and andolan against vote stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.