'बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते', बाळासाहेबांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 02:23 PM2021-01-23T14:23:47+5:302021-01-23T14:56:30+5:30

Uddhav Thackeray : मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

'Balasaheb Thackeray was a brilliant form of Hindutva', greetings to Balasaheb from Chief Minister Uddhav Thackeray | 'बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते', बाळासाहेबांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

'बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते', बाळासाहेबांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिवादन

googlenewsNext
ठळक मुद्दे"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दांत सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील."

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित खासदार अरविंद सावंत यांनी देखील पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

"छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवा यांनाच जीवन मानणारे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचे तेजस्वी रूप होते. प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्याकडून त्यांनी पुरोगामित्व आणि सामान्य माणसाच्या व्यथांना आवाज देण्याची शिकवण घेतली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमाप्रश्न या आंदोलनात बाळासाहेबांनी नेतृत्वाची परिसीमा गाठली. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकीय आणि समाजकारणात चैतन्य फुलविणारे बाळासाहेब लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, परखड वक्ते, मनस्वी कलाकार असे बहुआयामी होते", असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

याचबरोबर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दांत सामावणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील. सामान्य माणसांच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष मैदानात झुंजणाऱ्या, हिंदुत्व आणि मराठी माणसाचा बुलंद आवाज असलेल्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

बाळासाहेबांच्या पुतळ्याचे आज अनावरण
बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा मुंबईतील कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. नऊ फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण आज त्यांच्या 95 व्या जयंतीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अनेक नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. 

Web Title: 'Balasaheb Thackeray was a brilliant form of Hindutva', greetings to Balasaheb from Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.