नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 09:56 IST2025-11-13T09:52:11+5:302025-11-13T09:56:25+5:30
Maharashtra Local Body Election 2025: पालघरमध्ये छोटा भाऊ, तर वसई-विरारमध्ये मोठ्या भावाची भूमिका निभावण्याची तयारी असल्याचे बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटले आहे.

नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
Maharashtra Local Body Election 2025: मतदार याद्यातील घोळ, दुबार मतदार, चुकीचे पत्ते लक्षात घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच घेण्यात याव्यात, अशी मागणी विरोधक करत असतानाच राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी (एकूण २८८) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान; तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
पालघर नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडीसोबत बहुजन विकास आघाडी आणि मनसे एकत्र येऊ शकतात, असा कयास बांधला जात आहे. याबाबत प्रस्ताव दिले असल्याची माहिती स्थानिक नेत्यांनी दिली आहे. याबाबत बोलताना बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीशी सरकारात्मक चर्चा झाल्याचे म्हटले आहे.
पालघरमध्ये छोटा भाऊ, वसई-विरारमध्ये मोठा भाऊ
पालघर जिल्ह्यातील नगरपरिषदा, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीसोबत येण्याचा प्रस्ताव बहुजन विकास आघाडीला देण्यात आला असून, त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे हिंतेंद्र ठाकूर यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यातील नगर परिषद, जिल्हा परिषदेत बहुजन विकास आघाडी छोट्या भावाच्या भूमिका निभावेल; मात्र, वसई-विरार महापालिका निवडणुकीत बहुजन विकास आघाडी ही मोठा भाऊ असेल. वसई-विरार महापालिका निवडणुकीसाठी मविआ आणि मनसेशी आघाडी करण्याबाबत चर्चा सुरू असल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे.
मला कोणत्याही पक्षाची एलर्जी नाही
शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसची चर्चा सुरू आहे. नगरपालिकेत निवडून येणारे उमेदवार, कोणतेही रुसवे-फुगवे, हट्ट, मान-सन्मान टाळून युती करावी. जिकडे स्वबळावर लढायचे आहे, तिथे स्वबळावर लढा, अशी सूट देण्यात आलेली आहे. दोन पावले मागे घेण्याची तयारी सगळ्या पक्षांनी घेतली पाहिजे. सन्मानजनक तोडगा कसा काढता येईल, हे बघा. तेवढे बोलणे झालेले आहे. मला कुणाचीही एलर्जी नाही. कोणत्याही जाती-धर्माला सोबत घेऊन जाणाऱ्या पक्षाशी युती करण्यात माझी कोणतीही हरकत नाही. सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळू शकतो, ते पाहावे. असेच उमेदवार असले पाहिजेत, असे हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्टपणे सांगितले.
दरम्यान, जागावाटपासंदर्भात बोलताना ठाकरे गटाच्या नेत्याने माहिती दिली. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि बहुजन विकास आघाडीसोबतही (बविआ) जागावाटपाची चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही काँग्रेस बरोबरही बसलो, आम्ही राष्ट्रवादी पक्ष बरोबरही बसलो, आम्ही मनसेबरोबरही बसलो आणि आम्ही बहुजन विकास आघाडी बरोबर बसलो. भाजपा आणि शिंदे गटाला रोखण्यासाठी हा नवा राजकीय प्रयोग केला जात असून, १७ वार्डांच्या या नगरपंचायतीमध्ये अध्यक्षपद मिळाले असून, लवकरच जागावाटपाचा अंतिम निर्णय होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रत्येक वॉर्डात महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकला पाहिजे, या दृष्टीने आम्ही प्रत्येकाशी चर्चा करत आहोत. कोणत्या वॉर्डात काँग्रेस, ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला जागा मिळेल, याबाबत बैठका होत आहेत, असेही ते म्हणाले.