रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 09:22 IST2025-07-21T09:21:26+5:302025-07-21T09:22:02+5:30
पोलिस ठाण्यात अनभिज्ञ असलेल्या अधिकाऱ्याने पवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताच ‘आवाज खाली..शहाणपणा करू नका..’ असे म्हणत पोलिसांनाच धारेवर धरले होते.

रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई : विधानभवनातील गोंधळ प्रकरणानंतर नितीन देशमुखांच्या शोधात आझाद मैदानपोलिस ठाण्यात पोहोचलेल्या रोहित पवार यांनी पोलिसांनाच दम भरल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आझाद मैदान पोलिसांनी याप्रकरणी रोहित पवार यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवला आहे.
नितीन देशमुख यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यासाठी जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या करत घोषणाबाजी सुरू केली. कारवाईला अडथळा निर्माण होत असल्याने पोलिसांनी देशमुखांना आझाद मैदान पोलिस ठाण्यात नेल्याचे सांगितले. तेथून पवारांचा ताफा आझाद मैदान पोलिस ठाण्यात धडकला. ‘नितीन देशमुख कुठेय?’ म्हणत त्यांनी पोलिस ठाणे डोक्यावर घेतले.
मात्र, पोलिस ठाण्यात अनभिज्ञ असलेल्या अधिकाऱ्याने पवारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करताच ‘आवाज खाली..शहाणपणा करू नका..’ असे म्हणत पोलिसांनाच धारेवर धरले होते. या संवादाचा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर टीकात्मक प्रतिक्रिया उमटल्या. अखेर, आझाद मैदान पोलिसांनी शनिवारी रात्री उशिराने याप्रकरणी गुन्हा नोंदवत तपास करत आहे.
...तर दाद कोणाकडे मागायची : रोहित पवार
आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यावर विधानभवनात गुंडानी हल्ला केला. मकोकाचे आरोप असलेल्या गुंडांना अटक करायचे सोडून नितीन देशमुखलाच अटक केली. दोन महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया झालेल्या जागेवर मारहाण झाल्याने त्यांची विचारपूस करण्यासाठी देशमुख यांची भेटी द्यावी, अशी मागणी करताच, पोलिसांनी चार-पाच वेगवेगळ्या पोलिस स्टेशनला ३ ते ४ तास फेऱ्या मारायला लावत उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा दावा रोहित पवारांनी केला. पोलिस प्रशासन कायद्याने कारवाई करणार असेल तर सहकार्यच राहते. परंतु, काही पोलिस राजकीय आदेशाने वागणार असतील तर काय? दाद कुणाकडे मागायची, असे रोहित पवार म्हणाले.