चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 06:08 IST2025-10-10T06:07:50+5:302025-10-10T06:08:33+5:30
अनोळखी महिला पाटील यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या माेबाइल क्रमांकावरून फोन करत हाेती. तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यावर काही तरुणींचे अश्लील फाेटाे पाठविले

चंदगडच्या आमदाराला ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकविण्याचा प्रयत्न, ठाण्यात गुन्हा
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : काेल्हापुरमधील चंदगडचे आ. शिवाजी पाटील यांना माेबाइलद्वारे अश्लील मेसेज आणि फाेटाे पाठवून त्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करीत त्यांच्याकडे दहा लाखांची मागणी एका महिलेने केली. पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पाेलिस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
ही अनोळखी महिला पाटील यांना गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या माेबाइल क्रमांकावरून फोन करत हाेती. तिने सुरुवातीला त्यांच्याशी चॅटिंग केल्यानंतर त्यांना फोन करून मैत्रीची इच्छा व्यक्त केली. संवाद वाढल्यावर काही तरुणींचे अश्लील फाेटाे पाठविले. पुढे त्यांच्याकडे तिने कधी एक लाख, कधी दाेन लाख तर कधी पाच लाख रुपये अशी एकूण दहा लाखांची मागणी केली.
काही दिवसांनंतर आमदारांनी त्या महिलेचा त्रास वाढल्याने तिला ब्लॉक केले. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तिने दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा संपर्क साधत अश्लील छायाचित्रे आणि संदेश पाठवण्यास सुरुवात केली. पैसे न दिल्यास पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करीन आणि राजकीय प्रतिमा मलिन करीन, अशी धमकीही तिने दिली.
पैशांची मागणी वाढल्यानंतर पाटील यांनी ८ ऑक्टाेबर राेजी ठाण्यातील चितळसर पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्राथमिक तपासात सायबर हनी ट्रॅपचा हा प्रकार असून, आरोपी महिलेचा शोध घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.