धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न जिवावर बेतला; वर्षभरापूर्वीच लग्न झालेल्या महिलेचा दुर्दैवी अंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 13:32 IST2026-02-01T13:29:38+5:302026-02-01T13:32:13+5:30
बदलापूर येथील रेल्वे स्थानकात धावती लोकल पकडताना एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. चेतना चंद्रशेखर देवरुखकर (वय, २८) असे तिचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी ८ वाजून ११ मिनिटांची घडली.

धावती लोकल पकडण्याचा प्रयत्न जिवावर बेतला; वर्षभरापूर्वीच लग्न झालेल्या महिलेचा दुर्दैवी अंत
बदलापूर येथील रेल्वे स्थानकात धावती लोकल पकडताना एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. चेतना चंद्रशेखर देवरुखकर (वय, २८) असे तिचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी ८ वाजून ११ मिनिटांची घडली.
चेतना या जुवेली येथील जगन्नाथ गॅलेक्सीत वास्तव्याला होत्या. वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. सकाळी नेहमीप्रमाणे त्या ८:११ मिनिटांची मुंबईकडे जाणारी जलद लोकल पकडण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. स्थानकात आल्यानंतर लोकल पादचारी पुलासमोरच महिला डबा असतो. तो पकडताना त्याठिकाणी रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी देखील उपस्थित होते. मात्र, लोकल सुरू झाल्यावर चेतना यांनी कोणताही विचार न करता थेट लोकल पकडण्याचा प्रयत्न केल्याने ही घटना हताशपणे पाहण्याशिवाय कर्मचाऱ्यांसमोर कोणताही मार्ग नव्हता.
लोकल सुरू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी ती पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुंबई दिशेकडील पहिलाच महिला डबा पकडताना त्यांचा अंदाज चुकला आणि त्या लागलीच प्लॅटफॉर्मच्या खाली पडल्या. प्लॅटफॉर्मचा शेवट असल्याने त्या थेट चालत्या लोकलखाली गेल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
८:११ ची लोकल गाठण्यासाठी धावपळ
अपघाताचा सीसीटीव्ही समोर आला असून केवळ चेतना याच नव्हे तर अनेक महिला देखील लोकल सुरू होण्याआधी धावतपळत लोकल पकडत होत्या. त्यामुळे सकाळच्या वेळेस महिलांच्या डब्यात लोकल पकडण्यासाठी होणारी कसरत पुन्हा समोर आली आहे. सकाळी ८:११ मिनिटांनी सुटणारी लोकल पकडता न आल्यास नंतर तब्बल ४० मिनिटांनंतर बदलापूरहून सुटणारी लोकल आहे. त्यामुळे ८:११ ची ही लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू असते.