ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 19:22 IST2025-08-11T19:18:56+5:302025-08-11T19:22:11+5:30
मोबाइल हिसकावून घेण्याच्या उद्देशाने एका गर्दुल्ल्याने धावत्या ट्रेनच्या फूटबोर्डवर बसलेल्या प्रवाशाच्या हातावर काठीने हल्ला केला.

ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
मोबाइल हिसकावून घेण्याच्या उद्देशाने एका गर्दुल्ल्याने धावत्या ट्रेनच्या फूटबोर्डवर बसलेल्या प्रवाशाच्या हातावर काठीने हल्ला केला. त्यावेळी आपला फोन वाचवण्याच्या प्रयत्नात संबंधित प्रवाशी ट्रेनच्या खाली पडला. दुर्दैवाने, या घटनेत प्रवाशाने दोन्ही पाय कायमचे गमावले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एकाला अटक केली असून पुढील कारवाईला सुरुवात केली. ही घटना गेल्या आठवड्यात शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव निकम (वय, २२) असे पीडित तरुणाचे नाव आहे. निकम हा गेल्या आठवड्यात ट्रेनच्या फूटबोर्डवर बसून प्रवास करत असताना शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान एका गर्दुल्ल्याने त्याच्या काठीने त्याच्या हातावर फटका मारला. त्यामुळे निकमच्या हातातून मोबाइल सुटला आणि मोबाइल पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा तोल जाऊन तोही खाली पडला. त्याचा डावा पाय चाकाखाली गेला.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून निकमला रुग्णालयात दाखल केले. तसेच कल्याणच्या आंबिवलीतील इराणी बस्ती येथून चोराला अटक केली. या घटनेत निकमला त्याचा एक पाय गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त केली जात असून
मध्य रेल्वेच्या रेल्वे रुळांशेजारी ओव्हरहेडच्या खांबावर गर्दुल्ले दबा धरुन बसलेले असतात आणि ट्रेनच्या दारात बसलेल्या प्रवाशांना टार्गेट करतात. हे गर्दुल्ले लाकडी बांबूचा वापर करून त्याच्या हातावर फटका मारून मोबाईल खाली पाडतात. त्यानंतर ते मोबाईल उचलून पसार होतात. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांकडून या फटका गँगविरोधात करण्यात आलेल्या कारवाईची आकडेवारी वेळोवेळी जारी केली जाते. परंतु, थोड्या दिवसांनी हे गर्दुल्ले पुन्हा सक्रीय होतात. या गर्दुल्ल्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे.