विधानसभा निवडणुकीपूर्वी फौजदारांची रिक्त पदे भरणार
By Admin | Updated: September 9, 2014 04:36 IST2014-09-09T04:36:22+5:302014-09-09T04:36:22+5:30
राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. आगामी दुर्गोत्सव आणि निवडणुकांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात का होईना या जागा भरण्याचा निर्णय महासंचालकांनी घेतला आहे

विधानसभा निवडणुकीपूर्वी फौजदारांची रिक्त पदे भरणार
यवतमाळ : राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या शेकडो जागा रिक्त आहेत. आगामी दुर्गोत्सव आणि निवडणुकांपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात का होईना या जागा भरण्याचा निर्णय महासंचालकांनी घेतला आहे. त्याकरिता राज्यभरातून सेवा ज्येष्ठ सहायक फौजदार आणि जमादारांची यादी मागविण्यात आली आहे.
पोलीस महासंचालकांनी यासंबंधी ४ सप्टेंबर २0१४ रोजी बिनतारी संदेश यंत्राद्वारे राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना संदेश पाठविला आहे.
त्यानुसार सर्वच पोलीस प्रमुखांनी सेवा ज्येष्ठ सहायक उपनिरीक्षक आणि जमादारांच्या नावांची शोधाशोध सुरू केली आहे. सेवाज्येष्ठ असलेल्या एएसआय व जमादारांना स्थानिक पातळीवर तात्पुरत्या स्वरूपात फौजदार म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात फौजदाराच्या एक हजार २३८ जागा रिक्त आहेत. या जागा दुर्गा महोत्सव आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)