assembly elections Congress Appeal to apply for nomination till July 6 | विधानसभेच्या तयारीत काँग्रेस आघाडीवर; ६ जुलैपर्यंत इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन
विधानसभेच्या तयारीत काँग्रेस आघाडीवर; ६ जुलैपर्यंत इच्छूकांना अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई - लोकसभा निवडणुकीतील पराभव बाजूला सारून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले आहे. राज्यात विविध पक्षांच्या युती आणि आघाड्याच्या चर्चा सुरू असताना काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकत ६ जुलैपर्यंत विधानसभा निवडणुक लढविण्यासाठीच्या इच्छूक उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्यात येईल अशी चर्चा होती. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अशोक चव्हाण यांच्याकडे राज्याची जबाबदारी कायम ठेवली. त्यानुसार अशोक चव्हाण आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. या पार्श्वभूमीवर विविध पातळीवर नेत्यांसोबत चर्चा आणि बैठका सुरू आहेत. तसेच पूर्वतयारीचा आढावा घेण्यात येत आहे.

या तयारीचा भाग म्हणून काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्यांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. इच्छूक उमेदवारांनी आपले अर्ज ६ जुलैपर्यंत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, मुंबई येथे सादर करावे, असंही काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला रंग चढत आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या वतीने राज्यात दौरे सुरू करण्यात आले आहे. भाजपकडून राज्यभर रथयात्रा काढण्यात येणार आहे. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील राज्यात दौरे करत आहेत. तीन महिन्यांनंतर राज्यात निवडणूक होणार आहे.

 

 


Web Title: assembly elections Congress Appeal to apply for nomination till July 6
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.