बिहारसारखी महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा; राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सरकारला सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 15:06 IST2023-11-10T15:02:12+5:302023-11-10T15:06:29+5:30
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजतोय

बिहारसारखी महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवा; राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा सरकारला सल्ला
Maratha Reservation in Maharashtra, Ashoka Chavan : बिहार विधानसभेने आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याबाबतचे विधेयक काल मंजूर केले गेले. याबाबत प्रतिक्रिया देताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक महत्त्वाची मागणी केली. बिहारप्रमाणे महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा वाढवण्यात यावी, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला. "जे बिहारमध्ये शक्य आहे ते महाराष्ट्रात का नाही? राज्य विधीमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारने महाराष्ट्रातही आरक्षण मर्यादा शिथिल करण्याबाबत पावले उचलावीत; जेणेकरून मराठा आरक्षणाचा मार्ग सुकर होऊ शकेल," असे मत त्यांनी व्यक्त केले.
"बिहारच्या या विधेयकाला तेथील भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी पाठिंबा दिल्याचेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. देशात जातनिहाय जनगणना करावी आणि आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाने अगोदरच स्वीकारली असून, हैद्राबाद व नवी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत तसे ठरावही मंजूर करण्यात आले आहेत, याकडे लक्ष वेधून राज्य सरकारने याबाबत पुढाकार घ्यावा", असे स्पष्ट विधान चव्हाणांनी केले.