"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 16:31 IST2024-05-29T16:30:47+5:302024-05-29T16:31:04+5:30
मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करून देशातील बिघडवण्याचा जितेंद्र आव्हाडांकडून प्रयत्न केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला"; जितेंद्र आव्हाडांना अटक करण्याची राष्ट्रवादीची मागणी
Jitendra Awhad : राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एससीईआरटीने मनुस्मृतीमधील श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडल्याने याला विरोध सुरु झालाय. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आक्रमक भूमिका घेत महाडच्या चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृतीचं दहन केलं. मात्र यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले एक पोस्टर फाडून टाकले. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या कृतीवरुन सत्ताधारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करणार्या जितेंद्र आव्हाड यांना अटक करा अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे.
मनुस्मृतीमधील श्लोकांचा राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या निर्णयावरुन जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मनुस्मृतीचे दहन करताना जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणीदेखील केली. मात्र यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टरही फाडण्यात आलं. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादीने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मनुस्मृती जाळण्याच्या नावाखाली जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडली आणि ती पायदळी तुडवली. त्यामुळे जितेंद्र आव्हाडांवर राज्य सरकारने तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली.
"महाड येथे मनुस्मृती जाळण्याचा स्टंट करून देशातील आणि राज्यातील सामाजिक वातावरण बिघडवण्याला जितेंद्र आव्हाड जबाबदार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडणारे जितेंद्र आव्हाड यांच्यावर शरद पवार तुम्ही काय कारवाई करणार आहात याचे उत्तर आंबेडकरी जनतेला दिले पाहिजे आणि जितेंद्र आव्हाड यांची पक्षातून हकालपट्टी करावी," अशी मागणीही उमेश पाटील यांनी केली.
जितेंद्र आव्हाडांनी नाक रगडून माफी मागावी - अमोल मिटकरी
"स्टंटबाजीच्या नादात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो फाडलेत. स्टंटबाजीत आपण काय मूर्खपणा केला हेही आव्हाडांच्या लक्षात येऊ नये. आंबेडकर प्रेमी म्हणून या घटनेचा जाहीर निषेध! आव्हाडांनी तात्काळ देशाची माफी मागावी. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी महाडलाच बाबासाहेबांच्या जोड्यांवर नाक रगडून माफी मागावी अन्यथा याचे तीव्र पडसाद उमटलेले दिसतील," असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिलाय.