'शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय का?', शिंदेंच्या आमदाराचा सवाल, बैठकीमुळे पडली ठिगणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 15:11 IST2025-02-11T15:09:18+5:302025-02-11T15:11:01+5:30

Ajit Pawar Shiv Sena Mla : अजित पवारांनी रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनाही बोलवण्यात आलं नाही.

'Are Shiv Sena MLAs being ignored?', Shinde's MLA questions, meeting leads to chaos | 'शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय का?', शिंदेंच्या आमदाराचा सवाल, बैठकीमुळे पडली ठिगणी

'शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय का?', शिंदेंच्या आमदाराचा सवाल, बैठकीमुळे पडली ठिगणी

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमुळे महायुतीत वादाची ठिगणी पडली आहे. अजित पवारांच्या दालनात झालेल्या या बैठकीला मंत्री अदिती तटकरेचं उपस्थित होत्या. शिवसेनेच्या एकाही आमदाराला याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे आमदारांना नाराजी लपवता आली नाही. या बैठकीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी हे शिवसेनेच्या आमदारांसोबत जाणीवपूर्वक सुरू आहे का? असा सवाल केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

शिवसेनचे आमदार महेंद्र थोरवे या बैठकीबद्दल बोलताना म्हणाले, "आज रायगड जिल्ह्याची जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक मंत्रालयात घेण्यात आली. या बैठकीसंदर्भात आमदारांना कोणतीही कल्पना देण्यात आली नाही. जिल्हाधिकारी ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतात, मग आमदार, लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला का बोलवण्यात आलं नाही?", असा सवाल महेंद्र थोरवे यांनी केला.

आम्हाला डावलण्यात आले; महेंद्र थोरवेंनी व्यक्त केली नाराजी

"आम्हाला यासंदर्भात माहिती देण्याची जिल्हाधिकाऱ्यांचीही जबाबदारी होती. परंतू अजित पवारांच्या दालनात ती बैठक घेण्यात आली. त्या बैठकीला आमदारांना डावलण्यात आले. आमदारांना माहिती दिली गेली नाही. आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी आहोत. आमच्या मतदारसंघातही प्रश्न आहेत. हे प्रश्न आम्हाला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सोडवायचे असतात. मग जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला बैठकीला बोलवायला हवे होते", अशा शब्दात महेंद्र थोरवे यांनी नाराजी व्यक्त केली. 

आम्हाला का बोलवलं नाही? 

"माझ्या मते रायगड जिल्ह्यात जे काही आता राजकारण सुरू आहे. हे जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना डावललं जातंय का? अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जिल्हा नियोजन समिती बैठकीला फक्त मंत्री असत नाही, आमदार-खासदार सगळे उपस्थित असतात. पण, हे जाणीवपूर्वक आम्हाला त्याठिकाणी बोलवण्यात आलं नाही. याचं कारण आम्हाला समजलं नाही", असे म्हणत महेंद्र थोरवे यांनी बैठकीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.     

महेंद्र थोरवे यांच्याबरोबरच महेंद्र दळवी यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करू, असेही महेंद्र दळवी म्हणाले आहेत.

पालकमंत्री पदाचा घोळ

रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अदिती तटकरेंकडे देण्यात आले होती. पण, नंतर नाशिकसह रायगडच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेना आग्रही आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून पालकमंत्री आपल्याकडे ठेवण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे. 

Web Title: 'Are Shiv Sena MLAs being ignored?', Shinde's MLA questions, meeting leads to chaos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.