राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना महाआवासची मंजुरीपत्रे, सांगलीत जयकुमार गोरे यांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 13:45 IST2025-02-18T13:41:38+5:302025-02-18T13:45:44+5:30

पुण्यात शनिवारी मुख्य कार्यक्रम; अमित शाह यांची उपस्थिती 

Approval letters of Pradhan Mantri Mahaavas to 20 lakh beneficiaries in the state, minister Jayakumar Gore reviewed in Sangli | राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना महाआवासची मंजुरीपत्रे, सांगलीत जयकुमार गोरे यांनी घेतला आढावा

राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना महाआवासची मंजुरीपत्रे, सांगलीत जयकुमार गोरे यांनी घेतला आढावा

सांगली : प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या हप्त्याचे वितरण शनिवारी (दि. २२) होणार आहे. राज्यभरातील २० लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी मंजुरीचे पत्र वितरित केले जाईल. याचा मुख्य कार्यक्रम पुण्यात होणार असून केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी त्यासाठी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी सोमवारी सांगली जिल्हा परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्याच्या तयारीचा आढावा घेतला.

आढावा बैठकीत सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले. सांगलीत मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी गोरे यांचे स्वागत केले. यावेळी ग्रामीण विकास प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, प्रमोद काळे आदी उपस्थित होते.

गोरे यांनी सांगितले की, पुण्यातील मुख्य कार्यक्रमापूर्वी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत कार्यक्रम घ्यावेत. जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत, तालुक्याला आमदारांच्या उपस्थितीत व ग्रामपंचायतीत आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सुमारे १०० लाभार्थ्यांचा मेळावा घ्यायचा आहे. पुणे येथील राज्यस्तरावरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण राज्यभरात होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींत स्क्रीनची व्यवस्था करावी. हा कार्यक्रम उत्सवी स्वरुपात केला जावा.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात ३२ हजार १३३ घरकुलांचे उद्दिष्ट आहे. यातील मंजूर लाभार्थ्यांना या दिवशी मंजुरीपत्र व पहिला हप्ता वितरित केला जाणार आहे.

दोन मंत्री अचानक जिल्हा परिषदेत

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे सोमवारी अचानक जिल्हा परिषदेत आले. सोलापूरहून कोल्हापूरला जाताना व्हिडिओ काॅन्फरन्सिंगसाठी त्यांनी अचानक सांगलीत थांबण्याचा निर्णय घेतला. तसा निरोप सकाळी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला मिळाला. ऐनवेळच्या कार्यक्रमामुळे प्रशासनाची धावपळ झाली. याचदरम्यान, सायंकाळी सहा वाजता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे - पाटील हेदेखील जिल्हा परिषदेत अचानक आले. गोरे कोल्हापरला जाणार असल्याने त्यांच्यासोबत एकाच गाडीतून जाण्यासाठी ते आल्याचे सांगण्यात आले.

१० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता

पुण्यातील कार्यक्रमात शाह यांच्या हस्ते महाआवासच्या २० लाख लाभार्थ्यांना एकाच वेळी घरकुल मंजुरीचे पत्र दिले जाईल. तर १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्याचे अनुदान वितरित केले जाईल. या कार्यक्रमापूर्वी राज्यभरात ग्रामपंचायतस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

Web Title: Approval letters of Pradhan Mantri Mahaavas to 20 lakh beneficiaries in the state, minister Jayakumar Gore reviewed in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.