Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 13:02 IST2025-08-12T13:01:35+5:302025-08-12T13:02:23+5:30
Maharashtra Police Recruitment 2025. गेल्या दोन महिन्यांत राज्य पोलीस दलाने दोन महिन्यांत ७० टक्के भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे

Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
Maharashtra Police Bharti 2025: गेल्या अनेक दिवसांपासून ज्या भरतीची तरूण वाट पाहत होते, त्या १५ हजार पोलीस भरतीला मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडली. या बैठकीत गृह विभागाने मांडलेला १५ हजार पोलीस भरतीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.
राज्य मंत्रिमंडळात घेतलेले महत्त्वाचे निर्णय
महाराष्ट्र पोलिस दलात सुमारे १५००० पोलिस भरतीस मंजुरी (गृह विभाग)
राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य वितरण (अन्न, नागरी पुरवठा विभाग)
सोलापूर-पुणे-मुंबई हवाई प्रवासाकरिता Viability Gap Funding निधी देण्याचा निर्णय (विमानचालन विभाग)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अखत्यारीत महामंडळांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल. शासन हमीस पाच वर्षासाठी मुदतवाढ (सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग)
दुकानदारांचा नफा वाढणार
राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत शिधापत्रिकाधारकांना ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्याच्या वितरणासाठी रास्त भाव दुकानदारांना सध्या देण्यात येणाऱ्या ₹१५०/- रुपये प्रति क्विंटल (₹१५०० प्रति मेट्रिक टन) या मार्जिन दरामध्ये ₹२०/- प्रति क्विंटल (₹२०० प्रति मेट्रिक टन) एवढी वाढ करून त्यांना ₹१७०/- प्रति क्विंटल (₹१७०० प्रति मेट्रिक टन) मार्जिन देण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजित वार्षिक ₹९२.७१ कोटी इतका अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रास्त भाव दुकानदारांची मार्जिनमध्ये वाढ करण्याची मागणी होती. याबाबत अनेक बैठका देखील पार पडल्या होत्या. रास्त भाव दुकानदारांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक होते त्यामुळे आज मंत्रिमंडळाने रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
२ महिन्यात ७० टक्के पोलीस भरती पूर्ण
गेल्या दोन महिन्यांत राज्य पोलीस दलाने दोन महिन्यांत ७० टक्के भरती प्रक्रिया पूर्ण केली आहे. २०२२ - २०२३ वर्षातील १७ हजार ४७१ शिपायांची रिक्त पदे भरण्यासाठी यावर्षी १९ जून पासून मैदानी चाचण्या सुरू झाल्या. त्यात ११ हजार ९५६ पदांसाठी उमेदवार निवडण्यात आले असून त्यांना नियुक्ती पत्रे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलीस शिपाई ९,५९५, चालक पोलीस शिपाई १,६८६ बॅण्डस्मन ४१, सशस्त्र पोलीस शिपाई- ४,३४९ पदे, कारागृह शिपाई १,८०० पदे असे एकूण १७,४७१ पदे भरण्याकरीता जाहिरात देण्यात आली होती. त्यासाठी एकूण १६ लाख ८८ हजार ७८५ उमेदवारांचे अर्ज झाले होते. १९ जून २०२४ पासून मैदानी चाचणी, कौशल्य चाचणी व नंतर लेखी परीक्षा घेण्यात आली अशी माहिती राजाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) राजकुमार व्हटकर यांनी दिली होती.