आणखी एका ओलेक्ट्रा ईलेक्ट्रीक बसचा भीषण अपघात; दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बस स्थानकात घुसलेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 01:52 IST2024-12-10T01:52:05+5:302024-12-10T01:52:34+5:30
Kurla Bus Accident: एसटी महामंडळ आणि बेस्टसह इतर महापालिकांच्या ताफ्यात ओलेक्ट्रा या कंपनीच्या ईलेक्ट्रीक बस आहेत. शनिवारी रात्री शिर्डीहुन नाशिकला जाणाऱ्या ईलेक्ट्रीक बसचा बस स्थानकावरच अपघात झाला होता.

आणखी एका ओलेक्ट्रा ईलेक्ट्रीक बसचा भीषण अपघात; दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये बस स्थानकात घुसलेली
बेस्टच्या ताफ्यातील ईलेक्ट्रीक बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईतील कुर्ला एल भागातील वर्दळीच्या रस्त्यावर रात्री पावणे दहाच्या सुमारास बेस्टच्या बसने भरधाव वेगात वाहनांना ठोकर देत जवळपास २५ लोकांना उडविले आहे. यामध्ये आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन दिवसांपूर्वीच या कंपनीच्या ईलेक्ट्रीक बसचा असाच अपघात झाला होता.
एसटी महामंडळ आणि बेस्टसह इतर महापालिकांच्या ताफ्यात ओलेक्ट्रा या कंपनीच्या ईलेक्ट्रीक बस आहेत. शनिवारी रात्री शिर्डीहुन नाशिकला जाणाऱ्या ईलेक्ट्रीक बसचा बस स्थानकावरच अपघात झाला होता. बस नुकतीच स्थानकात फलाटावर आली होती. चालकाने लॉगशीटमध्ये एन्ट्री केली आणि त्याने पुन्हा बसमध्ये येत ती बस सुरु केली. यावेळी मोठा आवाज झाला व बस अचानक अनियंत्रित होऊन स्थानकात घुसली. यावेळी समोरून पतीसोबत जात असलेल्या एका भाविक महिलेचा बसची धडक बसल्याने मृत्यू झाला होता.
कुर्ल्यात सोमवारी रात्री भरधाव वेगात बस गजबजलेल्या रस्त्यावर घुसली. यावेळी बसने सुमारे ३०० ते ४०० मीटर रस्त्यावर समोर जे येईल त्याला ठोकर दिली. या अपघातात बसने जवळपास २५ लोकांना उडविले असून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्या भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याचा दावा चालकाने केला आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय चाचणीदेखील करण्यात आली आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून चालकावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सह पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले आहे. तसेच रुग्णालयासह घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढत आहे. पोलिसांकडून नागरिकांना गर्दी कमी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या अपघातात पोलिस वाहनालाही बस धडकली असून तीन पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाची चौकशी सुरु असल्याचे डीसीपीनी सांगितले आहे.