'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 18:41 IST2025-08-17T18:40:07+5:302025-08-17T18:41:20+5:30

अण्णा हजारे यांनी मागच्या काळात जे केले ते तरूणांनी केले पाहिजे असं वाटायला हवे. आपले कर्तव्य आहे की नाही..? असा सवाल अण्णा हजारे यांनी विचारला. 

Anna Hazare broke his silence from the 'Aata Thari Utha' banner in Pune, saying, "This is my misfortune..." | 'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."

'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."

अहिल्यानगर - राज्यात सध्या मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगावर विरोधकांकडून गंभीर आरोप होत आहेत. यातच पुण्यात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा उल्लेख करून एक बॅनर झळकला, त्यात अण्णा, आता तरी उठा अशा आशयाचे मजकूर लिहून त्यांच्यावर पुणेरी शैलीत टीका करण्यात आली होती. या बॅनरवर अण्णा हजारे यांनी मौन सोडले आहे. हे माझे दुर्दैव आहे अशी खंत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, भ्रष्टाचार होऊ नये, भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी मी १० कायदे केले. माहितीचा अधिकार देशाला मिळाला. यातून किती जागृती दिली. दफ्तर दिरंगाई, बदलीचा कायदा, लोकपाल, लोकायुक्त यासारखे १० कायदे आणले. आता ९० व्या वर्षानंतर अण्णा हजारेंनी हे करतच राहावे आणि तुम्ही झोपून राहावे अशी कुणाची अपेक्षा असेल तर हे चुकीचे आहे. अण्णा हजारे यांनी मागच्या काळात जे केले ते तरूणांनी केले पाहिजे असं वाटायला हवे. आपले कर्तव्य आहे की नाही..? असा सवाल त्यांनी विचारला. 

तसेच नुकताच आपण स्वातंत्र्यदिन साजरा केला. मी देशाचा नागरीक आहे. नुसते हातात तिरंगा घेऊन काही होणार नाही. या देशासाठी ज्यांनी बलिदान केले त्यांची आठवण ठेवली पाहिजे. फक्त दुसऱ्यांवर बोट दाखवून त्यातून बदल होणार नाही. तरुणांनी जागे झाले पाहिजे. मी मोठ्या आशेने तरुणांकडे पाहत आहे. युवाशक्ती ही राष्ट्रशक्ती आहे. ही तरूणाई जागी झाली तर उद्याचं भविष्य दूर नाही असं मला वाटते. म्हणून कायदे करून तरूणांच्या हातात दिले आहेत. आता एवढी वर्ष झाली, आजही अण्णा हजारे यांनी जागे व्हावे हे ऐकल्यानंतर वाईट वाटते अशी खंत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. 

नेमकं काय प्रकरण?

भारतातील भ्रष्टाचार विरोधी चळवळीचा प्रमुख चेहरा म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे पाहिले जाते. भारतात २०१४ साली सत्तांतर होण्यास अण्णा हजारे यांनी केलेले आंदोलन कारणीभूत ठरल्याचे बोलले जाते. अण्णांनी केलेल्या आंदोलनचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता मात्र बऱ्याच दिवसांपासून अण्णा हजारे आंदोलनापासून दूर आहेत. त्यावरून पुण्यात काहींनी पुणेरी शैलीत अण्णांवर टीका करणारे बॅनर लावले होते.

"अण्णा आतातरी उठा...कुंभकर्णसुद्धा गाढ झोपेतून रावणासाठी आणि लंकेसाठी उठला होता. तुम्ही आपल्या देशासाठी आतातरी उठा..होय मतांची चोरी झालेली आहे... India Against Votechori...देशात मतांची चोरी होत असताना, देशात भ्रष्टाचार फोफावला असताना, देशात हुकूमशाही माजलेली असताना, देशाची लोकशाही धोक्यात असताना, अण्णा तुमच्या सारखा जेष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?  अण्णा, दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर पुन्हा तुमची जादू पाहण्यासाठी देश आतुर आहे" अशा आशयाचे बॅनर लागले होते. त्यावर अण्णा हजारेंनी नाराजी व्यक्त केली. 
 

Web Title: Anna Hazare broke his silence from the 'Aata Thari Utha' banner in Pune, saying, "This is my misfortune..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.