मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:38 IST2025-07-16T14:31:06+5:302025-07-16T14:38:56+5:30

एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Anandraj Ambedkar supports Eknath Shinde; Shinde Sena-Republican Sena alliance announced | मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा

मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा

मुंबई - आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला साथ दिली आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्तिक युतीची घोषणा केली आहे. शिंदे हे वेगळे नेते असून ते सर्वांना सोबत घेऊन जातात. कुठल्याही अटीशिवाय आम्ही ही युती करत आहोत. चळवळीतील नेत्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे अशी माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली.

या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, आज आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आनंदाचा दिवस आहे. शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्हीही सेना आहेत. रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून मी काम केले. सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हीच आपली सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे तळागाळातील सामान्य माणसांशी नाळ तुटता कामा नये हे पथ्य पाळण्याचं काम आपण केले. आनंदराज आंबेडकर हेदेखील ज्यांनी या देशाची घटना लिहिली त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे वारस आहेत. बाबासाहेबांच्या घटनेमुळे सर्वसामान्य माणूस उच्चपदावर पोहचला. संविधानामुळे मी मुख्यमंत्री झालो, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. त्यामुळे संविधान महत्त्वाचे आहे. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे. तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तसेच आनंदराज आंबेडकर माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून काम करतात. त्यांना फार मोठा वारसा आहे. आज आनंदराज यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आनंदराज आंबेडकर यांनी पाळले. तुमचा स्वभाव सर्वसामान्यांसारखा आहे. त्यांची भूमिका आणि तळमळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जनसेवेची संधी दिली पाहिजे. सत्तेत गेल्यानंतरच जनतेची सेवा करू शकतो. सत्ता जनतेच्या सेवेसाठी राबवायची असते. कुठलीही सत्ता सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी वापरायची असते. अनेक योजनेतून आम्ही समाजातील घटकांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केले. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले. लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही केला ते आनंदराज आंबेडकर यांना पटले. एका विचाराने, विश्वासाने आपण एकत्र येतो तेव्हा युती सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करेल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. 

दरम्यान, शिवशक्ती-भीमशक्ती ही कार्यकर्त्यांची फौज असलेली सेना आहे. आपला वैयक्तिक अजेंडा नाही. सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे. कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभतो. आरोग्याच्या सुविधा दिल्या, कुणीही उपचाराविना राहता कामा नये. लेक लाडकी योजना आणली. महाराष्ट्र पुढे जातोय. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे ठरणार आहे. देशाची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर आणायचे आहे. त्यात महाराष्ट्र प्रमुख योगदान देणारे राज्य ठरेल. आज आम्ही एकत्र आलो, प्रमुख म्हणून नव्हे तर कार्यकर्ता म्हणून काम करू. काही लोक सहकाऱ्यांना घरगडी समजायचे पण आपल्याला कार्यकर्त्यांना मोठे करायचे आहे. हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्ता नेत्याला मोठा करतो. कार्यकर्ता पक्षाला निवडणूक जिंकून देतो. अडचणीत आलेल्या कार्यकर्त्यामागे नेत्याने खंबीरपणे उभा राहिले पाहिजे. त्यामुळे आनंदराज आंबेडकर आणि आमची जोडी एकदम सुपरहीट आहे असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

...म्हणून एकनाथ शिंदेंसोबत आलो

खरेतर ही जी युती आहे ती बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली युती आहे. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात राजकीय आणि सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. एकनाथ शिंदे आणि आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत. मुख्यमंत्री असतानाही शिंदे कार्यकर्त्याप्रमाणे वागत होते. कार्यकर्ता म्हणून प्रत्येक तळागाळातील माणसासोबत एकरूप होण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अशा कार्यकर्त्यासोबत देशातला आणि महाराष्ट्रातला आंबेडकरी समाज सोबत आहे. हा समाज अनेक वर्ष रस्त्यावरची लढाई लढत आला परंतु कार्यकर्त्यांना काही मिळाले नाही. त्यामुळे या कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ व्हावा यासाठी आम्ही एकत्र येण्याचे ठरवले असं आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले. 

Web Title: Anandraj Ambedkar supports Eknath Shinde; Shinde Sena-Republican Sena alliance announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.