“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 10:06 IST2025-11-03T10:03:55+5:302025-11-03T10:06:36+5:30
NCP Ajit Pawar Group Amol Mitkari News: महाविकास आघाडी, मनसेचा सत्याचा मोर्चा रिकामटेकड्याचा मोर्चा होता. महायुतीचा धसका घेतल्याने हास्यजत्रा काढली, अशी टीका करण्यात आली आहे.

“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
NCP Ajit Pawar Group Amol Mitkari News: कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तर, आगामी आषाढी एकादशीपर्यंत अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत आणि त्यांनी आषाढी एकादशीची महापूजा करावी, अशी प्रार्थना पांडुरंगाकडे करतो. ज्या दिवशी अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, त्याच दिवशी दिवाळी असेल, असा आशावाद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला.
आमचे साकडे लवकरच पांडुरंग मान्य करेल, अशी त्याच्या चरणी एक कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे. अजित पवार यांचे बारामतीमधील स्थान वेगळे आहे. रोहित पवार यांना महायुतीच्या मांडीवर बसण्याचे डोहाळे लागलेले आहेत. घरी नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा, अशी गत रोहित पवार यांची झालेली आहे. सत्तेविणा अस्वस्थ असलेले रोहित पवार सातत्याने ट्विट करण्याची संधी सोडत नाहीत. महाराष्ट्राला माहिती आहे की, यांना लगीनघाई कशाची झालेली आहे. यांना मांडीवर घ्यायचे की, दूर करायचे हे महायुतीच्या डायरीत आहे. त्यामुळे रोहित पवार यांनी आपल्या पक्षाकडे पाहावे. दुसऱ्याच्या घरात डोकावू नये, असा हल्लाबोल अमोल मिटकरी यांनी केला.
मनसे महाविकास आघाडीचा मोर्चा म्हणजे हास्यजत्रा
महाविकास आणि मनसेचा सत्याचा मोर्चाबाबत बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, महायुती भक्कपणे काम करत आहे. महाविकास आघाडीत पूर्णपणे रिकामटेकडे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे हा मोर्चा निघाला. याला महायुती फारसे गांभीर्याने घेत नाही. महायुती आपले काम व्यवस्थितपणे करत आहे. जनतेचा उद्रेक झाला, तर जनक्षोभ म्हणता येऊ शकेल. परंतु, तसे काही नाही. याचा मनसे आणि महाविकास आघाडीला किती फायदा होईल, हे येणार काळ सांगेल. जनतेला कोण काम करते, ते महत्त्वाचे आहे, महायुती काम करत आहे. महायुतीचा धसका या लोकांनी घेतला आहे. त्यामुळे हे लोक अशा हास्यजत्रा काढत आहे, या शब्दांत अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला.
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीबाबत अजित पवार यांचे विधान मोडून तोडून दाखवले गेले आहे. बारामतीत असताना अजित पवार वेगळ्या टोनमध्ये बोलत असतात. जे नेहमीप्रमाणे ट्विट करून बालिशबुद्धीचे प्रदर्शन करत आहेत. त्यांच्या बुद्धीची कीव येते, असा पलटवार अमोल मिटकरी यांनी केला.