"पुन्हा थोबाड चालवले, तर कपडे काढून मारणार", अमेय खोपकर यांचा अमोल मिटकरींना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2024 23:00 IST2024-08-01T22:58:15+5:302024-08-01T23:00:02+5:30
Amol Mitkari on Ameya Khopkar : "दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल."

"पुन्हा थोबाड चालवले, तर कपडे काढून मारणार", अमेय खोपकर यांचा अमोल मिटकरींना इशारा
Amol Mitkari Ameya Khopkar : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गट) यांच्यातील वाद वाढत चालला आहे. राज ठाकरेंवरील (Raj Thackeray) टीकेमुळे आधी मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांची गाडी फोडली. त्यानंतर आता मनसे नेते मिटकरींबाबत आणखी आक्रमक झाले आहेत. दरम्यान, आज मनसेच्या अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांनी अमोल मिटकरींवर जोरदार निशाणा साधला. तसेच, "अमोल मिटकरींनी पुन्हा थोबाड चालवले, तर कपडे काढून मारणार", असा इशाराही दिला आहे.
सिंधुदूर्गात माध्यमांशी बोलताना अमेय खोपकर म्हणतात, "राज ठाकरे यांच्यावर टीका करणारेअमोल मिटकरी कोण आहेत? त्यांची पात्रता काय आहे? अमोल मिटकरी घासलेट चोर आहेत. ते त्यांच्या गावात आधी घासलेट चोरायचे आणि विकायचे. राज ठाकरेंवर बोलायची त्यांची लायकी नाही. टीका करायची असेल तर करा, मात्र खालच्या पातळीवर जाऊन बोलायचे नाही."
"पक्षाच्या अध्यक्षांनी टीका केली तर काही नाही, पण दुसऱ्या, तिसऱ्या फळीतील नेत्यांनी पातळी सोडून टीका केल्यास कानाखाली आवाज निघेल. अजित पवार चोरलेल्या पक्षाचे अध्यक्ष आहेत. आता यापुढे अमोल मिटकरींनी पुन्हा थोबाड चालवले तर कपडे काढून मारणार. मग आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे ते दाखल करा", असा इशारा मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिला आहे.
राज ठाकरेंना मुख्य आरोपी करा, अजित पवार गटाची मागणी
अमोल मिटकरी यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्ला करायला लावणाऱ्या राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना मुख्य आरोपी करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील केली आहे.