Amol Kolhe on Eknath Shinde : सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:43 IST2025-07-05T12:42:09+5:302025-07-05T12:43:19+5:30
Amol Kolhe on Eknath Shinde Jai Gujarat : एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात'ची घोषणा दिल्याने वाद पेटला

Amol Kolhe on Eknath Shinde : सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
Amol Kolhe on Eknath Shinde Jai Gujarat : महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले. त्यातच मराठीत न बोलल्याने काहींना मारहाण करण्याचेही प्रकार घडले. त्याच दरम्यान शुक्रवारी पुण्यातील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणाच्या शेवटी जय महाराष्ट्र नंतर जय गुजरात म्हणाले. या मुद्द्यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेतून निशाणा साधला.
अमोल कोल्हे यांची कविता
एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातची घोषणा दिली. त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी कविता पोस्ट करत एकनाथ शिंदेंवर टीका केली. "दाढीवाला बाबा वदला.. इतिहासाची पाने बदला, सुरतेची “स्वारी” आता हुजरेगिरी साठी उरली आहे, महाराष्ट्र आंदण देऊन.. बदल्यात “जय गुजरात“ ची बोली आहे!" अशी कविता अमोल कोल्हेंनी केली.
दाढीवाला बाबा वदला..
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) July 4, 2025
इतिहासाची पाने बदला,
सुरतेची “स्वारी” आता
हुजरेगिरी साठी उरली आहे
महाराष्ट्र आंदण देऊन..
बदल्यात “जय गुजरात“ ची बोली आहे !#मराठी#महाराष्ट्र#जय_महाराष्ट्र
एकनाथ शिंदे यांनी काय दिलं स्पष्टीकरण...
"पुण्यात पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या गुजराती बांधवांनी एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारले आहे. त्यात सर्वसामान्य लोकांना विविध सोयी आणि सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याचे आज लोकार्पण झाले. मी नेहमी जय हिंद जय महाराष्ट्र तर म्हणतच असतो, जय हिंद हा देशाचा अभिमान तर जय महाराष्ट्र हा राज्याचा अभिमान. त्यासोबत मी शेवटी जय गुजरात म्हणालो, कारण समोरची सगळी लोकं गुजराती समाजाची होती आणि त्यांनी वर्षानुवर्षे आणि पिढ्यानपिढ्या या महाराष्ट्राला आपली कर्मभूमी मानली. तिथे जो प्रकल्प उभा राहिला आहे, तो सर्व लोकांसाठी आहे. त्यामुळे त्यांची प्रशंसा करण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी मी तसे म्हणालो," असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले.