"अमित शाहांच्या विधानातून संविधान निर्मात्यांबद्दल असलेला भाजपाचा राग बाहेर आला’’, नाना पटोले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 16:35 IST2024-12-18T16:35:05+5:302024-12-18T16:35:55+5:30

Nana Patole Criticize Amit Shah: अमित शाह यांच्या या विधानातून भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे तेच बाहेर आले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा भाजपाचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

"Amit Shah's statement revealed BJP's anger towards the makers of the Constitution", says Nana Patole | "अमित शाहांच्या विधानातून संविधान निर्मात्यांबद्दल असलेला भाजपाचा राग बाहेर आला’’, नाना पटोले यांची टीका

"अमित शाहांच्या विधानातून संविधान निर्मात्यांबद्दल असलेला भाजपाचा राग बाहेर आला’’, नाना पटोले यांची टीका

नागपूर - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर नाव घेण्याची फॅशनच आली आहे. एवढ्यावेळा देवाचे नाव घेतले तर देव पावला असता असे वक्तव्य केले. अमित शाह यांच्या या विधानातून भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे तेच बाहेर आले असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचा भाजपाचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या विधानाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना जगण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला, त्यामुळेच आपण सर्वजण स्वाभिमानाने आपल्या देशात नांदत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी खदखद आहे तीच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली आहे. अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने त्यांनी देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.

विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापती यांची निवड बिनविरोध करण्याची परंपरा महाराष्ट्रात राहिली आहे. विधानसभेचा उपाध्यक्ष, परिषदेचा उपसभापती विरोधी पक्षांचा करण्याची परंपरा आहे ती खंडीत झालेली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भूमिका मांडली आहे व ते याबाबत सकारात्मक आहेत. सभागृह चालवण्यासाठी विरोधी पक्षनेता नाही अशी व्यवस्था योग्य नाही. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता असला पाहिजे, त्यावर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title: "Amit Shah's statement revealed BJP's anger towards the makers of the Constitution", says Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.