राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 07:10 IST2025-07-26T07:10:01+5:302025-07-26T07:10:30+5:30
राज्य सरकारमध्ये ८०० कोटी रुपयांचा ‘रुग्णवाहिका घोटाळा’ झाला असून हा निधी शिंदेसेनेचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या ट्रस्टकडे वळविण्यात आल्याचा खळबळजनक आरोप उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला.

राज्यात ८०० कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, निधी गेला श्रीकांत शिंदेंच्या ट्रस्टकडे : खा. राऊत
मुंबई : राज्य सरकारमध्ये ८०० कोटी रुपयांचा ‘रुग्णवाहिका घोटाळा’ झाला असून हा निधी शिंदेसेनेचे खा. श्रीकांत शिंदे यांच्या ट्रस्टकडे वळविण्यात आल्याचा खळबळजनक आरोप उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केला. मात्र हे आरोप शिंदेसेनेने फेटाळले आहेत.
पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, राज्य सरकारने रुग्णवाहिका खरेदीसाठी निविदा काढली होती आणि त्याचे कंत्राट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या जवळच्या सहकाऱ्याच्या कंपनीला देण्यात आले होते. ८०० कोटी रुपयांच्या रुग्णवाहिका खरेदीचे कंत्राट सुमित फॅसिलिटीज लिमिटेडला देण्यात आले होते. त्याची प्रत्यक्ष किंमत १०० कोटी रुपये होती; परंतु कंत्राटाची रक्कम फुगविण्यात आली. वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा घोटाळा आहे. सुमित फॅसिलिटीजचे अमित साळुंके हे श्रीकांत शिंदे फाउंडेशनचा आर्थिक कणा आहेत. हा पैसा फाउंडेशनकडे वळविण्यात आला.
अमित साळुंखे यांच्या चौकशीतून अनेक गोष्टी समोर येतील. मात्र या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे असेही खासदार राऊत म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर खा. राऊत यांनी केलेल्या आरोपामुळे हे प्रकरण आणखी वाढत जाईल असे चित्र दिसत आहे. मात्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राऊत यांचे आरोप फेटाळले आहेत. या आरोपांना कोणताही आधार नाही, असे ते म्हणाले.
झारखंडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एक पथक गुरुवारी महाराष्ट्रात आले होते. तेथील दारू घोटाळ्यात अमित साळुंकेला अटक केली आहे. अमित हा शिंदे पिता-पुत्रांचा जवळचा सहकारी आहे, असाही आरोप राऊत यांनी केला आहे.