अजबच! इथे भाजपाने चक्क काँग्रेससोबत केली युती, मित्रपक्षाला बाहेर ठेवण्यासाठी जुळवलं समीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 18:13 IST2026-01-06T18:13:10+5:302026-01-06T18:13:58+5:30
Ambernath Municipal Corporation Election: मुंबईजवळच्या अंबरनाथ शहरातील नगर परिषदेमध्ये अजब समीकरण जुळून आलं आहे. येथे भाजपाने मित्र पक्ष असलेल्या शिंदेसेनेला सत्तेबाहेर ठेवून बहुमताचं गणित जुळवण्यासाठी चक्क काँग्रेससोबत आघाडी केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

अजबच! इथे भाजपाने चक्क काँग्रेससोबत केली युती, मित्रपक्षाला बाहेर ठेवण्यासाठी जुळवलं समीकरण
भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय राजकारणातील एकमेकांचे पारंपरिक विरोधी पक्ष मानले जातात. तसेच दोन्ही पक्षांमधील विचारसरणीतील भिन्नतेमुळे सर्वसाधारण दोन्ही पक्ष कधीही एकत्र येऊ शकत नाहीत. त्यांच्यात राजकीय आघाडी, युती होऊ शकत नाही, असे मानले जाते. मात्र मुंबईजवळच्या अंबरनाथ शहरातील नगर परिषदेमध्ये अजब समीकरण जुळून आलं आहे. येथे भाजपाने मित्र पक्ष असलेल्या शिंदेसेनेला सत्तेबाहेर ठेवून बहुमताचं गणित जुळवण्यासाठी चक्क काँग्रेससोबत आघाडी केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या तेजश्री करंजुले पाटील ह्या शिंदेसेनेच्या मनिषा वाळेकर यांचा पराभव करून नगराध्यक्षपदावर निवडून आल्या होत्या. मात्र नगर परिषदेमध्ये भाजपाला बहुमत मिळालं नव्हतं. तर इथे शिंदेसेना मोठा पक्ष ठरला होता.
त्यामुळे नगराध्यक्षपदासह इतर निवडींसाठी एकमेकांविरोधात लढलेले भाजपा आणि शिंदेसेना पुन्हा युती करून एकत्र येणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र भाजपाने सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिंदेसेनेला अंबरनाथच्या सत्तेतून बाहेर ठेवण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि काँग्रेस या पक्षांच्या नगरसेवकांची मोट बांधत सत्तेचं समीकरणं सोडवलं आहे.
दरम्यान, भाजपाने काँग्रेससोबत केलेलेल्या आघाडीवर शिंदेसेनेने सडकून टीका केली आहे. शिंदेसेनेने भाजपा आणि काँग्रेसमधील या युतीची अभद्र युती अशी संभावना केली आहे.