Vande Bharat: अवघ्या १२ तासांत पुण्याहून नागपूर गाठा, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 14:29 IST2025-08-09T14:28:04+5:302025-08-09T14:29:00+5:30
Nagpur-Pune Vande Bharat Train: पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील.

Vande Bharat: अवघ्या १२ तासांत पुण्याहून नागपूर गाठा, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ!
पंतप्रधान नरेंद्र मोदी १० ऑगस्ट रोजी तीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील, ज्यात नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या भारतातील सर्वात लांब अंतराची वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा समावेश आहे. ही ट्रेने नागुपरातील अजनी येथून पुणेदरम्यान धावेल. विशेष म्हणजे, ही ट्रेन अवघ्या १२ तासांत ८८१ किमी अंतर पूर्ण करेल. त्यामुळे नागपूर ते पुणे ताटकाळत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. महत्त्वाचे म्हणजे, रेल्वे मंत्रालयाने नागपूर - पुणे वंदे भारत एक्सप्रेससाठी अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, ही सेवा नेमकी कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
अजनी-पुणे वंदे भारत एक्सप्रेस नागपूर ते पुणे मार्गावर वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, दौंड, अहिल्यानगर आणि कोपरगाव या स्थानकांवर थांबणार आहे. याच अनुषंगाने, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र पाठवून या गाडीला श्री संत गजानन महाराज नगरी – शेगाव येथेही थांबा देण्याची मागणी केली होती. रेल्वे मंत्रालयाने या मागणीला मान्यता दिली आहे. वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ९:५० वाजता अजनी येथून सुटेल आणि रात्री ९:५० वाजता पुण्यात पोहोचेल.
वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभाचा कार्यक्रम मुख्य रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकाच्या परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) आणि डॉग स्कॉडची नेमणूक करण्यात आली असून, रेल्वे पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे मागील दोन दिवसांपासून स्थानकावर भेटी देत सुरक्षा बंदोबस्ताची तपासणी करत आहेत.