Ajit Pawar: भाजपाशी हातमिळवणीच्या मुद्द्यावर चर्चा रंगली असताना अजित पवारांचे CM एकनाथ शिंदेंसाठी ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 15:03 IST2023-04-13T15:02:54+5:302023-04-13T15:03:25+5:30
अंजली दमानिया यांच्या दाव्याने खळबळ माजली आहे.

Ajit Pawar: भाजपाशी हातमिळवणीच्या मुद्द्यावर चर्चा रंगली असताना अजित पवारांचे CM एकनाथ शिंदेंसाठी ट्विट
Ajit Pawar Tweet : राज्याच्या राजकारणात गेले काही दिवस अनेक मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत. यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली होती. १५-१६ आमदार अपात्र ठरणार आहेत. अजित पवार भाजपसोबत जाणार आहेत, तेही लवकरच असा मोठा दावा अंजली दमानिया यांनी केला होता. यावर अजित पवार यांना प्रतिक्रिया देताना, या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही, असे सरळसरळ उत्तर दिले होते. त्यानंतरही हा विषय पुढे प्रसारमाध्यमे चघळत बसल्याचे दिसत आहेत. याच दरम्यान अजित पवार यांनी एका महत्त्वाच्या विषयावर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून दोन ट्वीट्स केली.
प्रसारमाध्यमांमध्ये अजूनही अजित पवार आणि भाजपा या विषयांवर चर्चा रंगल्या आहेत. पण अजितदादा मात्र राज्याच्या दृष्टीने पुन्हा कामाला लागले असून त्यांनी त्या संदर्भात ट्विट केले आहे. "मुख्यमंत्री महोदय, अगोदर कांदा अनुदानाचा जीआर काढायला सरकारकडून उशीर, त्यानंतर कांदा विक्रीसाठी फक्त तीन ते चार दिवसांची मुदत आणि आता अनुदानासाठीच्या जाचक अटी. अशा कारभारानं शेतकऱ्यांना अनुदान मिळणार आहे का? अनुदानासाठी लावलेल्या जाचक अटी रद्द करा, ई-पीकपेरा नोंदीबरोबरच तलाठ्यामार्फत लावलेल्या हस्तलिखित नोंदी ग्राह्य धरण्यासहीत बाजार समिती बाहेरील व्यापाऱ्यांच्या खरेदी पावत्या ग्राह्य धरा आणि सर्वांना सरसकट अनुदान द्या," असे ते ट्विट आहे.
अनुदानासाठी लावलेल्या जाचक अटी रद्द करा, ई-पीकपेरा नोंदीबरोबरच तलाठ्यामार्फत लावलेल्या हस्तलिखित नोंदी ग्राह्य धरण्यासहीत बाजार समिती बाहेरील व्यापाऱ्यांच्या खरेदी पावत्या ग्राह्य धरा आणि सर्वांना सरसकट अनुदान द्या.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 13, 2023
अंजली दमानिया यांनी काय केला होता दावा!
मी मंत्रालयात गेले होते तेव्हा तिथे एक चांगले पत्रकार माझ्या ओळखीचे आहेत. ते भेटले होते. त्यांनी तुम्हाला काही सांगायचे असे असे म्हटले होते. यावेळी त्यांनी अजित पवार हे विरोधी पक्षाच्या भूमिकेत बिलकुल दिसत नाहीएत. त्यांची आणि भाजपाची नक्कीच जवळीक दिसतेय. हे १५-१६ आमदार बाद होणार आहेत, अजित पवार भाजपासोबत जाणार आहेत, असे सांगितले. मी त्यांना तेव्हा मग काय करायचे, असे विचारले आणि पुढच्या कामाला निघून गेले, असे दमानियांनी सांगितले, असा खुलासा अंजली दमानिया यांनी आपल्या ट्विटसंदर्भात केला.