"आधी गोट्या खेळत होतात का?"; जितेंद्र आव्हाडांना 'दुहेरी धक्का' दिल्यावर अजितदादांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 21:17 IST2025-02-18T21:13:42+5:302025-02-18T21:17:29+5:30
Ajit Pawar Jitendra Awhad: दोन विश्वासू शिलेदारांनी सोडली आव्हाडांची साथ, ठाणे आणि मुंब्रा येथील शेकडो युवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश

"आधी गोट्या खेळत होतात का?"; जितेंद्र आव्हाडांना 'दुहेरी धक्का' दिल्यावर अजितदादांचा टोला
Ajit Pawar Jitendra Awhad: अभिजीत पवार राष्ट्रवादी पक्षात येत असताना त्याला काहींचे कॉल येत होते तू कुठे आहेस? आपण बसू, मार्ग काढू, अरे आता कधी मार्ग काढणार? अगोदर काय गोट्या खेळत होतात का? असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता लगावला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील विविध पक्षांत 'इनकमिंग' सुरुच आहे. आज जितेंद्र आव्हाड यांचे दोन विश्वासू शिलेदार अजितदादा गटात आले. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.
आज ठाणे आणि धुळे येथील अन्य पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. श्री. अभिजित पवार, श्री. हेमंत वाणी, श्रीम. सीमा वाणी यांसह अनेक मान्यवरांनी शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या आदर्श विचारांशी एकरूप होण्याचा, पक्षाच्या जनकल्याणाच्या कार्यात… pic.twitter.com/6NTBuzZ4Pv
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 18, 2025
एका माणसामुळे अनेक जण सोडून गेले...
"ठाणे जिल्ह्यातील अनेक लोक, मान्यवर राष्ट्रवादीत होते. ते एका माणसामुळे पक्ष सोडून गेले. का सोडून गेले, याचे आत्मपरीक्षण त्यावेळी कुणीच केले नाही. त्यावेळी ती करण्याची आवश्यकता होती. माणूस काम करतो, तो चुकतो मात्र एखाद्याने मुद्दाम चुका केल्या तर कोण सोबत शिल्लक राहणार नाही," असे अजित पवारांनी ठणकावून सांगितले.
नव्यांचा सन्मान, जुन्यांचा मान
"नेता व पक्ष यांना व्हिजन हवे आणि सर्व समाजघटकांना बरोबर घेऊन जायचे असते आणि तशा पध्दतीने आपला पक्ष काम करत आहे. राष्ट्रवादीची ताकद पक्षात येणाऱ्या अशा लोकांच्यामुळे वाढत असते. आपण बेरजेचे राजकारण करत आहोत. पक्षात नवीन आलेल्यांचा सन्मान केला जाईल आणि जुन्यांचाही मान राखला जाईल," असा शब्दही अजितदादांनी यावेळी दिला.
जितेंद्र आव्हाडांना दुहेरी दणका
जितेंद्र आव्हाड यांचे स्वीय्य सहाय्यक आणि शप गटाचे प्रदेश उपाध्यक्ष अभिजीत पवार आणि प्रदेश सरचिटणीस हेमंत वाणी यांच्यासह ठाणे शहर आणि मुंब्रा येथील शेकडो युवक कार्यकर्त्यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. महिला विकास मंडळ सभागृहात हा प्रवेश झाला. या दोन शिलेदारांचा पक्षप्रवेश हा जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का मानला जात आहे. अभितीत पवार आणि हेमंत वाणी हे जितेंद्र आव्हाड यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत. त्यांच्या प्रवेशाने ठाणे शहर व मुंब्रा येथील आव्हाडांच्या संघटनेला खिंडार पडल्याची कुजबूज आहे.