"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 16:41 IST2025-05-03T16:40:07+5:302025-05-03T16:41:00+5:30
Ajit Pawar: जळगावमधील दोन माजी मंत्री आणि तीन माजी आमदारांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
Ajit Pawar: बेरजेचे राजकारण करत करत सर्व जाती धर्माच्या घटकांना सोबत घेऊन काम करुया. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वांना सामावून घेऊन काम करतो हे त्या सर्व घटकांनाही वाटले पाहिजे. सभासद नोंदणी करून राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष उभा करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका पक्षप्रवेश कार्यक्रमात केले. जळगाव आणि धुळे जिल्ह्यातील शरद पवार गटाच्या असंख्य पदाधिकार्यांनी आज केसी कॉलेज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी अजित पवारांनी मत मांडले.
मी सत्तेसाठी हापापलेला नाही...
"आम्ही राजकारणात किंवा सार्वजनिक जीवनात जात-पात, धर्म कधी पाळला नाही. अठरापगड जातींना घेऊन शिवरायांनी जसे राज्य केले. त्याचपध्दतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत आहे. शिवसेना तुम्हाला चालत असेल, तर भाजपा का चालत नाही. मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही. सर्वाधिक सत्ता मी उपभोगली आहे. पण काहीजण सोयीनुसार कार्यकर्त्यांना विविध गोष्टी सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे आमदार होते, त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हावे असे ठरले होते. याला सर्वच आमदार साक्षीदार आहेत," अशी स्पष्ट कबुली अजितदादांनी दिली.
कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय आता पर्याय नाही!
"लोकांचे प्रश्न सुटावे, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी काम करत आलो आहे. राज्यात उभारली जाणारी महापुरूषांची स्मारके भावी पिढ्यांना प्रेरणा देतील अशी कामे सरकार करत आहे. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेशिवाय आता पर्याय राहिलेला नाही हे लक्षात घ्या. सर्वच क्षेत्रात हे तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता वापराशिवाय काहीच करता येणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता वापरातून हाताला काम मिळणार आहे," असेही त्यांनी सूचित केले.
कुणाकुणाचा झाला पक्षप्रवेश?
जळगाव जिल्हयातील माजी मंत्री सतिश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीपराव सोनवणे, धुळ्याचे माजी आमदार प्रा. शरद पाटील, उत्तरविभागीय अध्यक्ष शरद पवार गटाच्या नेत्या तिलोत्तमा पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जाहीर प्रवेश केला. याशिवाय जळगाव, धुळे, नंदुरबार, रावेर येथील जिल्हा परिषद, जिल्हा बँकेचे संचालक, पंचायत समिती, बाजार समिती मधील शरद पवार गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांनीही प्रवेश केला. यावेळी पक्षात प्रवेश देत असल्याचे जाहीर करतानाच प्रवेशकर्त्यांचे अजित पवार यांनी स्वागत केले.