आकाशात दोन घिरट्या, तीन वेळा आलटी-पालटी अन् विमान कोसळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 07:42 IST2026-01-29T07:33:20+5:302026-01-29T07:42:12+5:30
Ajit pawar Plane Crash: वेळ सकाळची. नेहमीप्रमाणे घराच्या बाजूला कामे सुरू होती. त्यावेळी अचानक एक विमान आकाशात घिरट्या घालताना दिसले. थोड्या वेळात पुन्हा त्याच विमानाने घिरटी घातली. पण, यावेळी घिरटी घालत असताना हवेतच त्याने दोन-तीन वेळा आलटी-पलटी घेतली अन् क्षणार्धात आमच्या घराच्या जवळच असलेल्या शेतात कोसळले...

आकाशात दोन घिरट्या, तीन वेळा आलटी-पालटी अन् विमान कोसळले
बारामती - वेळ सकाळची. नेहमीप्रमाणे घराच्या बाजूला कामे सुरू होती. त्यावेळी अचानक एक विमान आकाशात घिरट्या घालताना दिसले. थोड्या वेळात पुन्हा त्याच विमानाने घिरटी घातली. पण, यावेळी घिरटी घालत असताना हवेतच त्याने दोन-तीन वेळा आलटी-पलटी घेतली अन् क्षणार्धात आमच्या घराच्या जवळच असलेल्या शेतात कोसळले, अशी माहिती गोजुबावी (ता. बारामती) येथील प्रत्यक्षदर्शी अतुल आटोळे व अनिता आटोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गोजुबावीचे माजी सरपंच राघू आटोळे यांचे विमानतळानजीक शेतात घर आहे. अनिता आटोळे यांचा मुलगा आर्यन, दीर अतुल आटोळे गायीच्या गोठ्यात काम करीत असताना सकाळी ८:३०च्या सुमारास विमान आकाशात घिरटी घेताना दिसले. नंतर दुसऱ्या वेळी ८:४५ वा. दरम्यान विमान गोजुबावी हद्दीतील मंदिराच्या उंचीइतके खाली आले. परंतु, वैमानिकाला ते विमान पुन्हा धावपट्टीवर आणता आले नाही. विमान वेगात खाली येताना आकाशात दोन-तीन वेळा आलटी-पलटी झाले. त्यानंतर विमान वस्तीच्या बाजूला दगडावर कोसळले. सुरुवातीला एक छोटा स्फोट झाला, नंतर मोठा, असे दोन स्फोट झाले. यात विमानाने पेट घेतला.
माझा मुलगा आर्यन, दीर अतुल आम्ही मदतीसाठी धावलो. परंतु, उशीर झाला होता. विमानातील सर्व प्रवासी बाहेर फेकले गेले होते. सुरुवातीला शिकाऊ विमान असेल, असा आमचा समज झाला, परंतु विमानतळावर अजितदादांच्या स्वागतासाठी आलेले कार्यकर्ते लगेच घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी विमानात उपमुख्यमंत्री अजितदादा असल्याचे समजले. महाराष्ट्रातील जनतेच्या व बारामतीच्या लाडक्या दादांना आम्ही शेवटची मदत पोहोचवू शकलो नसल्याची खंत प्रत्यक्षदर्शी अनिता व अतुल आटोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
सकाळी जनावरांना चारा टाकायला बाहेर आलो. विमानाने २ घिरट्या घातल्या. विमान हेलकावे घेत होते. ८:४५ वाजता स्फोटाचा प्रचंड आवाज झाला. हा आवाज आजूबाजूच्या १० किमीच्या परिसरापर्यंत गेला असेल. जाळ खूप उंच होता. धूर आणि आगीमुळे आम्हाला ५० फूट मागेच थांबावे लागले.
- राघू मारोती आटोळे,
गोजुबावी गावचे रहिवासी
सकाळी मी धुणं-भांडे करत होती. जोराचा आवाज करत अचानक विमान खाली आले आणि क्षणात स्फोट झाला. आमच्या घरापर्यंत विमानाचे पार्ट उडून आले. आम्ही आवाज आणि जाळ बघून घाबरून गेलो.
- उर्मिला आटोळे, प्रत्यक्षदर्शी