Ajit Pawar Plane Crash Video: अजितदादांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडीओ, प्लेन क्रॅश झाल्यानंतर काय घडलं? पाहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 15:48 IST2026-02-15T15:46:24+5:302026-02-15T15:48:38+5:30
Ajit Pawar Plane Crash New Video: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडिओ समोर आला आहे.

Ajit Pawar Plane Crash Video: अजितदादांच्या विमान अपघाताचा नवा व्हिडीओ, प्लेन क्रॅश झाल्यानंतर काय घडलं? पाहा
२८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताचा आणखी एक नवा आणि अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अपघातानंतर विमानाने पेट घेतलेला असतानाच एक मोठा स्फोट झाल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे परिसरात पुन्हा एकदा खळबळ उडाली. या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाला आग लागल्याचे पाहून गावकरी मदतीसाठी धावले. मात्र, आगीच्या ज्वाळांमधून अचानक मोठा स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. या स्फोटाच्या तीव्रतेमुळे बचावकर्त्यांनाही काही काळ लांब राहावे लागले. प्रशासन आता या स्फोटाचा तांत्रिक तपास करत असून, विमानातील इंधन किंवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे हा स्फोट झाला का? याचा शोध घेतला जात आहे.
नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी दिल्लीत माहिती दिली की, विमान अपघात तपास ब्युरो या घटनेची वेगाने चौकशी करत आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स हस्तगत करण्यात आला असून त्याचा प्राथमिक अहवाल लवकरच प्रसिद्ध केला जाईल. व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या या लिअरजेट ४५ विमानाचा दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला होता.
२८ जानेवारी रोजी बारामतीमध्ये झालेल्या भीषण विमान अपघाताचा आणखी एक नवा आणि अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.#AjitPawarPlaneCrash#BaramatiCrashpic.twitter.com/9OyXXZjmon
— Lokmat (@lokmat) February 15, 2026
रोहित पवारांचा घातपाताचा संशय
दरम्यान, १० फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी या अपघाताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "या अपघातात काहीतरी गैरप्रकार असल्याचा संशय घेण्यास वाव आहे," असे सांगत त्यांनी या प्रकरणाची केवळ तांत्रिक नव्हे, तर तज्ज्ञ संस्थांमार्फत व्यापक चौकशी करण्याची मागणी केली. या आरोपामुळे अपघाताच्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची शक्यता आहे.