"निवडणुकीत शून्य जागा मिळालेल्या राज ठाकरेंनी सर्वात आधी..."; अजितदादा गटाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 18:02 IST2025-01-30T18:01:42+5:302025-01-30T18:02:14+5:30

Ajit Pawar vs Raj Thackeray : अजित पवार गटाचे ४१ आमदार कसे निवडून आले असा सवाल राज ठाकरेंनी आज उपस्थित केला होता

Ajit Pawar led NCP slams Raj Thackeray as MNS got zero seats in Maharashtra assembly elections 2024 | "निवडणुकीत शून्य जागा मिळालेल्या राज ठाकरेंनी सर्वात आधी..."; अजितदादा गटाचा टोला

"निवडणुकीत शून्य जागा मिळालेल्या राज ठाकरेंनी सर्वात आधी..."; अजितदादा गटाचा टोला

Ajit Pawar vs Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीत राज्यात एकही जागा जिंकता न आलेल्या मनसे पक्षाची आज मुंबईत जाहीर सभा झाली. पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी आजच्या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित केले. विधानसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या पराभवानंतर राज यांची ही पहिलीच सभा होती. त्यामुळे निवडणूक निकालावर राज काय बोलणार याकडे साऱ्यांचेच लक्ष होते. अपेक्षेनुसार राज यांनी निकालावर नाराजी व्यक्त करत अजित पवार गटाच्या यशावर टीका केली. या टीकेला अजितदादा गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

"विधानसभेत १२८ जागा लढवून शून्य जागा आणि फक्त १.५५ टक्के मते मिळालेल्या मनसे नेते राज ठाकरे यांनी पहिल्यांदा पक्ष आणि रेल्वे इंजिन हे चिन्ह वाचवण्यावर आत्मचिंतन करावे. मनसे कायम ऋतूप्रमाणे आपली भूमिका बदलणारा पक्ष दिसतो. गोंधळलेल्या अवस्थेमुळे महाराष्ट्रातील जनतेला राज ठाकरे यांच्या भूमिकेवर कधी विश्वास वाटला नाही. म्हणूनच मनसेला महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधीत्व मिळालेले नाही," अशा शब्दांत अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी मनसेवर टीका केली.

"महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागा कशा मिळाल्या याच्यावर चिंतन करण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाचेल, आपल्या पक्षात कार्यकर्ते, पदाधिकारी कसे टिकतील आणि महाराष्ट्रातील जनता आपली भूमिका स्वीकारेल का यावर राज यांनी आत्मचिंतन करावे. राज ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत परंतु या महाराष्ट्राने त्यांची बदलणारी भूमिका बघितली आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादीच्या बाजुने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार केला. २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत केवळ आणि केवळ नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी समर्थन दिले. विधानसभेत महायुतीत येणार की नाही अशा गोंधळलेल्या स्थितीत मनसे त्यावेळी होती. राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेत जरी अपेक्षित यश मिळाले नाही तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा जनतेसमोर गेला. महाराष्ट्रातील जनतेशी नाळ जोडून लोकांचे प्रश्न समजून ते सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसने केला," असे आनंद परांजपे म्हणाले.

"२०१९ मधील लोकसभेतील राज ठाकरे यांची सर्व भाषणे बघितली तर ज्या ठिकाणी कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते तिथे ते प्रचाराला गेले. महायुतीच्या विरोधात त्यांनी प्रचार केला. पंतप्रधानांच्या विरोधात भाषणे केली. तर दुसरीकडे २०२४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा निवडून आणायचे आहे यासाठी समर्थन दिल्याची भूमिका जाहीर केली होती. या गोंधळलेल्या अवस्थेमुळे महाराष्ट्रातील जनतेला त्यांच्या भूमिकेवर कधी विश्वास वाटला नाही," असा खोचक टोला आनंद परांजपे यांनी लगावला.

"राज ठाकरे यांच्या मनसेला २००९ मध्ये १३ आमदार निवडून आणता आले. मात्र त्यानंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत म्हणजे २०१४ ला एक आमदार निवडून आला. २०१९ ला एक आमदार आला. आता तर मनसेला महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधीत्वदेखील नाही. त्यामुळे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आहे," असे प्रत्युत्तर आनंद परांजपे यांनी दिले.

Web Title: Ajit Pawar led NCP slams Raj Thackeray as MNS got zero seats in Maharashtra assembly elections 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.