अजितदादांनी जनतेला नम्रपणे केलेले ‘ते’ आवाहन ठरले शेवटचे, ४ दिवस आधी केलेला व्हिडिओ समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 13:25 IST2026-02-06T13:18:51+5:302026-02-06T13:25:33+5:30
Ajit Pawar Last Video Before Sad Demise: अजित पवारांचा शेवटचा संदेश काय होता? हा व्हिडिओ देवगिरी निवासस्थानावरील असल्याचे म्हटले जात आहे.

अजितदादांनी जनतेला नम्रपणे केलेले ‘ते’ आवाहन ठरले शेवटचे, ४ दिवस आधी केलेला व्हिडिओ समोर
Ajit Pawar Last Video Before Sad Demise: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती येथे प्रचारसभा, बैठका घेण्यासाठी अजित पवार मुंबईतून निघाले होते. बारामती विमानतळावर विमान पोहोचताच विमानाला मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. अजूनही महाराष्ट्र अजितदादांच्या निधनाच्या धक्क्यातून बारामतीसह राज्यातील जनता अद्यापही सावरलेली नाही. यातच अजित पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ विमान अपघात होण्याच्या चार दिवस आधीचा असल्याचे म्हटले जात आहे.
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त येताच सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. यानंतर अजित पवार यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यातून अजित पवार यांची कामाचा माणूस असलेली प्रतिमा अधिक अधोरेखित झाली. अनेकांनी त्यांचे अनुभव, किस्से शेअर केले. अजित पवारांनी कशी मदत केली, एका भेटीत कसे काम झाले, याचे स्मरणही अनेकांनी केले. यातच अजित पवारांचा देवगिरी या निवासस्थानी चित्रित केलेला एक व्हिडिओ आता समोर आला आहे.
अजितदादांनी जनतेला नम्रपणे केलेले ‘ते’ आवाहन ठरले शेवटचे
अजित पवार यांचा विमान अपघातापूर्वी बनवलेला व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केला आहे. यापूर्वी अजित पवार यांनी शेवटचा फोन कुणाला केला होता, त्यात काय बोलणे झाले, याबाबतचा ऑडिओही जाहीर करण्यात आला होता. अजित पवारांचा हा व्हिडिओ १ मिनिट ४८ सेकंदाचा आहे. २४ जानेवारी रोजी हा व्हिडीओ बनवला. तर, २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. जिल्हा परिषद या ग्रामविकासाची किल्ली आहे. मी शब्दाचा पक्का व कामाचा माणूस आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने कायमच ग्रामीण विकासाला प्राधान्य दिलेले आहे. विकासाच्या या प्रवासात तुम्ही सहभागी व्हा. विकासाच्या प्रवासात राष्ट्रवादीला साथ द्यावी, असे आवाहन अजित पवार यांनी या व्हिडिओत केल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आता होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या निधनामुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात विशेष जोम नव्हता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारात न उतरण्याचा निर्णय घेतला. तर बहुतेक सर्व पक्षांनी साधेपणाने प्रचार केला. अनेक गावांनी तसे ठराव केले होते. राष्ट्रवादीचा ग्रामीण भागात त्यातही पश्चिम महाराष्ट्रात चांगला जम आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदारांचा चांगला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधु-भगिनींना जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदरणीय अजितदादांचा शेवटचा संदेश…!#NCP#Maharashtrapic.twitter.com/9sC8Nnh91v
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) February 5, 2026