Ajit Pawar-Devendra Fadnavis are back together in solapur | अजित पवार-देवेंद्र फडणवीस पुन्हा आले एकत्र, चर्चांना उधाण; पण...
अजित पवार-देवेंद्र फडणवीस पुन्हा आले एकत्र, चर्चांना उधाण; पण...

मुंबई : राज्यातील सत्ता नाट्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एकत्र आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. करमाळ्याचे आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचे लग्न काल माढ्यात पार पडले. या निमित्ताने अजित पवार आणि देवेंद्र फडणीस एकत्र आले होते. यावेळी या दोघांनी जवळपास 20 मिनिटे गप्पा मारल्या. त्यामुळे त्यांच्या या भेटीमुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पण, अजित पवार यांनी भेटीदरम्यान दोघांमध्ये काय चर्चा झाली, याबाबत खुलासा केला आहे. 

या भेटीसंदर्भात मीडियाशी बोलताना अजित पवार यांनी सांगितले की, "संजयमामा शिंदेंच्या मुलाच्या लग्नात फडणवीस आणि माझी खुर्ची शेजारी शेजारी होती. त्यावेळी आमच्यात हवा पाण्याबद्दल गप्पा झाला.” तसेच, महाआघाडी सरकारमध्ये अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार का?याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. याबाबत अजित पवारांना विचारले असता, ते म्हणाले, “मी उपमुख्यमंत्री व्हावे, असे कार्यकर्त्यांना वाटते. पण ते ठरविण्याचा निर्णय हा त्या-त्या पक्षप्रमुखांचा आहे. याशिवाय, खातेवाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे."

दरम्यान, राज्यात सत्ता स्थापनेसंदर्भात महाविकास आघाडीची चर्चा सुरु असतानाच, 23 नोव्हेंबर रोजी भाजपाला पाठिंबा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अजित पवारांनी वयक्तिक निर्णय घेतला असल्याचे सांगत राष्ट्रवादीचा भाजपाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, दोन दिवस अजित पवारांच्या मनधरणीचे प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे भाजपाकडे बहुमत नसल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यामुळे 80 तासात सरकार कोसळले. त्यानंतर काल सोलापूरमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली.
 

Web Title: Ajit Pawar-Devendra Fadnavis are back together in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.